वानखेडेवर दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवसापासून चेंडू वळायला लागले आणि या खेळपट्टीवर मोठी धावसंख्या होऊ शकत नाही हे साऱ्यांच्याच लक्षात आले आहे. एकीकडे भारताला तीनशे धावांमध्ये गुंडाळण्याचे आमचे प्रयत्न असतील असे इंग्लंडचा फिरकीपटू मॉटी पनेसार याने म्हटले आहे, तर दुसरीकडे तीनशे धावांचा टप्पा ओलांडण्याचे आमचे प्राथमिक ध्येय असल्याचे भारताचा नाबाद अर्धशतकवीर आर. अश्विन याने स्पष्ट केले आहे.
‘‘वानेखेडेची खेळपट्टी ही भारतातली सर्वोत्तम खेळपट्टी आहे. खेळपट्टीला चांगली उसळी असून चेंडूही चांगला वळत आहे, त्यामुळे पहिल्याच डावात तिनशे धावांचा टप्पा गाठण्याचे आमचे पहिले ध्येय असेल. चेतेश्वरने चांगली शतकी खेळी साकारून संघाला सावरले. शनिवारी मोठी भागीदारी करण्याचा आमचा प्रयत्न असेल,’’ असे अश्विनने सांगितले.
भारताच्या चार फलंदाजांना तंबूत धाडणाऱ्या इंग्लंडच्या पनेसारने सांगितले की, ‘‘भारताला ३०० धावांमध्ये गुंडाळण्याचे आमचे प्रयत्न असतील. खेळपट्टी फिरकीला फायदेशीर आहे आणि यावर गोलंदाजी करताना मला गोलंदाजी प्रशिक्षक मुश्ताक अहमदच्या मार्गदर्शनाचा चांगलाच फायदा झाला. चार फलंदाजांना मी बाद केले असले तरी ‘प्रिन्स ऑफ इंडिया’ सचिन तेंडुलकरची विकेट माझ्यासाठी मोलाची आहे.’’    

वानखेडेवरून
* सचिन आणि सेहवागचा सत्कार
दुसरा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांचा मुंबई क्रिकेट असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३ वर्षे पूर्ण केल्याबद्दल सचिन तेंडुलकरला आणि शंभरावी कसोटीचे औचित्य साधून सेहवागचा सत्कार करण्यात आला.    

* अँडरसनची अखिलाडूवृत्ती
जेम्स अँडरसनच्या ८१ व्या षटकांत चेतेश्वर पुजाराने हूकचा फटका खेळत शतक साजरे केले. इंग्लंडचा त्याची ही खेळी बोचणारीच होती, पण अँडरसनने षटक पूर्ण केल्यावर जाणून बुजून पुजाराला धक्का दिला. धक्का दिल्यावर ‘सॉरी’ बोलण्याची तसदीही घेतली नाही आणि पुन्हा एकदा अखिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले.    

* तिकिटासाठी रांगाच रांगा
भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यानंतर तिकिटासाठी लांब रांगा लागल्या होत्या. मुंबई हॉकी असोसिएशनच्या इथे असलेली तिकिटांची रांग चर्चगेट स्टेशनच्या बाहेपर्यंत गेली होती. रांगेतील माणसांना आवरताना पोलिसांच्या नाकी नऊ आले होते.    
प्रसाद मुंबईकर