करोना साथीमुळे या वर्षी भारतात होणारी टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ही स्पर्धा विश्वविजेता नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने जिंकली होती. गेल्या वर्षी या स्पर्धेत १० ग्रँडमास्टर्सनी सहभाग घेतला होता. पाच वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या विश्वनाथन आनंदचाही त्यात सहभाग होता. ‘‘करोना साथीचा प्रादुर्भाव पाहता खेळाडूंच्या आरोग्याची सुरक्षितता महत्त्वाची आहे. या स्थितीत या वर्षी ही स्पर्धा रद्द करण्यात आली आहे,’’ असे टाटा स्टीलचे उपाध्यक्ष चाणक्य चौधरी यांनी सांगितले. पुढील वर्षी ही स्पर्धा आयोजित करू, असा विश्वास स्थानिक आयोजक गेमप्लॅन स्पोर्ट्स कंपनीने व्यक्त केला आहे. ‘‘२०२१मध्ये निश्चितपणे टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करू असा विश्वास आहे,’’ असे गेमप्लॅन स्पोर्ट्स कंपनीचे संचालक जीत बॅनर्जी यांनी म्हटले.

‘‘टाटा स्टील बुद्धिबळसारखी दुसरी स्पर्धा नाही. स्पर्धेच्या रॅपिड (जलद) आणि ब्लिट्झ (अतिजलद) प्रकारांचा आनंद घेणे हा सर्वोत्तम अनुभव असतो. असे या स्पर्धेचे विक आन झी आणि कोलकातामधील संचालक जेरॉन बर्ग यांनी सांगितले.