आजच्या युगात शरीरावर ‘टॅटू’ काढून घेण्याची फॅशन वाढली आहे. ही जरी फॅशन असली तरी थायलंडची वासाना विनाथो या धावपटूच्या दृष्टीने टॅटू हेच तिच्या यशाचे गमक आहे. आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत तिने हेप्टॅथलॉनमध्ये सुवर्णपदक मिळविल्यावर नेमके हेच सांगितले.
शिवछत्रपती क्रीडानगरीत विनाथा हिने प्रेक्षकांमध्ये आदराचे स्थान निर्माण केले आहे. हात, दंड, पाठीवर ठिकठिकाणी तिने टॅटू काढून घेतले आहेत. तसेच अर्धे सोनेरी केस व हसतमुख चेहरा यामुळे तिच्याविषयी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्कंठा निर्माण झाली होती. उंच उडीत १.८२ मीटपर्यंत उडी मारल्यानंतर तिला खूप आनंद झाला, मात्र लगेचच ती मैदानाच्या कडेला जाऊन खूप रडली. त्याविषयी विचारले असता ती म्हणाली, ‘‘दोन वर्षांपूर्वी एका स्थानिक स्पर्धेत उडी मारताना मी पडले होते. माझ्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. माझी अ‍ॅथलेटिक्स कारकीर्दच संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळेच येथे अन्य खेळाडूंपेक्षा सर्वात उंच उडी मारल्यानंतर मला त्या दुखापतीची आठवण झाली व आनंदाश्रू आले.’’
तुझ्या शरीरावर असलेल्या टॅटूचे रहस्य काय, असे विचारले असता ३३ वर्षीय विनाथो म्हणाली, ‘‘ते माझे श्रद्धास्थान आहे. ज्या ज्या वेळी मला पराभवास सामोरे जावे लागते, त्या त्या वेळी मी आमच्या देवाचे चित्र असलेले टॅटू काढून घेते. त्यामुळे माझा उत्साह वाढतो व अधिक जोमाने सराव करीत मी यश खेचून आणते.’’
नजीकचे ध्येय मांडताना वासाना म्हणाली, ‘‘जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्याचा माझा प्रयत्न राहील. आशियाई क्रीडा स्पर्धा व ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धामध्ये पदक मिळविण्याचे माझे ध्येय आहेच.’’
‘बल्लवाचार्य’ अ‍ॅलेक्झांडर
अ‍ॅलेक्झांडर प्रोझोन्को हा पुणेकर प्रेक्षकांचा आवडता खेळाडू झाला आहे. गांधी टोपी घालून तो प्रेक्षकांमध्ये मुक्तपणे वावरत असतो. उद्घाटन समारंभात त्याने एका लोकगीतावर चक्क ठेका धरला होता आणि आता तो सांगता समारंभातही लावणीवर ठेका धरणार आहे. अनेक हिंदी गाणी आत्मसात केलेल्या या खेळाडूला येथील आमटी खूपच आवडली आहे. तो राहात असलेल्या हॉटेलमधील स्वयंपाकगृहात जाऊन त्याने भारतीय आमटीची कृती लिहून घेतली आहे. एवढेच नव्हे तर त्याने एक-दोन पदार्थ करूनही पाहिले.
जपानचे वेगळेपण!
स्पर्धेतील सरावाच्या ट्रॅकजवळ खेळाडूंसाठी छोटे तंबू उभारण्यात आले आहेत. जपानकरिताही असा तंबू असला तरी त्यांनी स्वत: आणलेल्या तंबूचाही ते उपयोग करतात.
मैदानावरील नाती-गोती!
मैदानावरही अनेकांची नाती जुळतात असे म्हटले जाते. कझाकिस्तानच्या दिमित्री व इरिना कापरेव्ह यांच्याबाबत असेच काहीसे घडले आहे. ११ वर्षांपूर्वी एका स्पर्धेनिमित्त या खेळाडूंची भेट झाली व त्याचे रूपांतर मैत्रीत झाले. इरिना हिने आपल्यापेक्षा काही महिन्यांनी लहान असलेल्या दिमित्रीकडे लग्नाची मागणी घातली आणि त्याने ते मान्यही केले. दिमित्री याने येथे डेकॅथलॉनमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. इरिना हिला मात्र दुखापतीमुळे अपेक्षेइतकी चांगली कामगिरी करता आलेली नाही. या जोडप्याला दोन मुले आहेत. दिमित्री याने ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक व आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. २०१६च्या ऑलिम्पिकमध्ये आम्ही दोघेही पदक मिळवू, अशी दिमित्री याला खात्री आहे. ताजिकिस्तान संघात अ‍ॅलेक्झांडर व क्रिस्तिना प्रोझोन्को या भावंडांचा समावेश आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा व ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धामध्ये पदक मिळविण्याचे त्यांचे ध्येय आहे.