29 May 2020

News Flash

महाकबड्डी लीगची करमणूक करचुकवेगिरी

महाकबड्डी लीगसाठी प्रेक्षकांकडून प्रत्येकी १५० रुपयांचे तिकीट दर आकारले जात असून या तिकीट दरावर आयोजकांनी १० टक्के करमणूक कर भरणे अपेक्षित आहे.

| June 2, 2015 01:22 am

महाकबड्डी लीगसाठी प्रेक्षकांकडून प्रत्येकी १५० रुपयांचे तिकीट दर आकारले जात असून या तिकीट दरावर आयोजकांनी १० टक्के करमणूक कर भरणे अपेक्षित आहे. मात्र महाकबड्डी लीगच्या आयोजकांनी रायगड येथे आयोजित सामन्यांच्या तिकिटांवर करमणूक कर भरलेला नसल्याने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

प्रो कबड्डीच्या धर्तीवर सध्या राज्यात
महा कबड्डी लीगचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई, खेड, अलिबाग आणि पुणे येथे ही लीग खेळवली जात आहे. यामध्ये नगर चॅलेंजर, मुंबई डेविल्स, रायगड डायनामॉज, बारामती हरीकेन्स, पुणे पॅन्थर्स, रत्नागिरी रायडर्स, सांगली रॉयल्स, ठाणे थंडर्स हे पुरुष व महिलांचे संघ या स्पध्रेत सहभागी झाले आहेत. राज्यातील दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. चार ठिकाणी खेळवल्या जाणाऱ्या या महाकबड्डी लीग सामन्यांसाठी प्रत्येक प्रेक्षकाकडून १५० रुपये तिकीट आकारले जात आहे.
वास्तविक पाहता तिकीट विक्री करण्यापूर्वी जिल्हा प्रशासनाच्या करमणूक विभागाकडून आयोजकांनी परवानगी घेणे अपेक्षित असते आणि विक्री केलेल्या प्रत्येक तिकिटामागे १० रुपये एवढा करमणूक कर भरणे अपेक्षित आहे. मात्र महाकबड्डी लीगचे चारही दिवसांचे सामने पूर्ण झाले असले तरी आयोजकांनी स्पध्रेतील तिकीट विक्रीवरील जिल्हा प्रशासनाकडे कोणताही करमणूक कर भरलेला नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी दिले आहेत. करमणूक विभागाच्या निरीक्षकांना आयोजकांकडे विचारणा करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर नियमानुसार देय करमणूक कराची रक्कम तातडीने भरून घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे याबाबत
महाकबड्डी लीगचे संयोजक मेहता यांच्याकडे विचारणा केली असता, आम्ही करमणूक कर भरला असल्याचे त्यांनी सांगितले मात्र करमणूक कर भरल्याच्या पावत्या दाखवण्यास असमर्थता व्यक्त केली.
लाखो रुपयांच्या जाहिरातींचे प्रायोजकत्व या कबड्डी लीगच्या आयोजनासाठी स्वीकारण्यात आले आहे. अशा वेळी तिकीट विक्रीवर करमणूक कराची रक्कम आयोजकांनी चुकवणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया क्रीडा रसिकांनी व्यक्त केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2015 1:22 am

Web Title: tax evasion by maharashtra kabaddi league
टॅग Sports,Tax Evasion
Next Stories
1 आम्ही जातो अमुच्या गावा..
2 ‘प्रो-कबड्डीने चमत्कार घडवला’
3 संक्षिप्त: इंग्लंड-न्यूझीलंड कसोटी रंगतदार अवस्थेत
Just Now!
X