इंग्लंडचा उदयोन्मुख खेळाडू जेम्स टेलरने हृदयविकारामुळे अचानक निवृत्ती जाहीर केली. २६ वर्षीय जेम्स इंग्लंडच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचा भाग होता. मात्र हृदयाच्या गंभीर आजारामुळे त्याने सर्व प्रकाराच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.
काऊंटी अजिंक्यपद स्पर्धेत नॉटिंघमशायर आणि सरे यांच्यात होणाऱ्या लढतीत टेलर नॉटिंघमशायरचे प्रतिनिधित्व करणार होता. मात्र गंभीर आजार असल्याचे निष्पन्न झाल्याने टेलरने या लढतीतून माघार घेतली. जेम्सच्या आजारावर उपाय म्हणून क्ष-किरण चाचणी करण्यात आली. त्यानुसार त्याला आरहायमोजेनिक राइट व्हेंट्रिक्युलर आरहायथिमिया हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आजार असल्याचे स्पष्ट झाले. या आजारावर उपचार म्हणून जेम्सवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
‘माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात वाईट कालखंड आहे. माझे जगच पालटले आहे. परंतु मी आशावादी आहे आणि संघर्ष करतच राहीन,’ अशा शब्दांत जेम्सने आपल्या भावना व्यक्त केल्या.
जेम्सला झालेल्या आजारासारख्या व्याधीमुळे काही दिवसांपूर्वी बोल्टन वाँडर्स संघाचा फुटबॉलपटू फॅब्रिस मुआंबाचे निधन झाले होते. २०१२ मध्ये एका लढतीदरम्यान तो मैदानात कोसळला आणि उपचारांआधीच त्याचे निधन झाले होते.
‘जेम्सबाबतची ही बातमी धक्कादायक आणि अनपेक्षित आहे. वैद्यकीय कारणांमुळे एका गुणी युवा खेळाडूची कारकीर्द थांबणे वेदनादायी आहे. दिलेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेत संघासाठी शंभर टक्के योगदान देणारा अशी जेम्सची ओळख आहे. मोठी भरारी घेण्याच्या काळात त्याच्यासारख्या मेहनती खेळाडूची कारकीर्द संपुष्टात येणे अतिशय दु:खद आहे’, असे इंग्लंड अ‍ॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू अँड्रय़ू स्ट्रॉस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नॉटिंघमशायर, जेम्सचे कुटुंबीय यांना इंग्लंड क्रिकेट बोर्डातर्फे सर्वतोपरी मदत करण्यात येईल असे त्यांनी पुढे सांगितले.
जेम्सच्या गंभीर आजाराचे वृत्त समजताच जगभरातील खेळाडूंनी त्याला शुभेच्छा देत या आजारातून लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.