खेळपट्टीवर फिरकीबरोबरच वेगवान गोलंदाजांना चांगली मदत मिळते आहे. त्यामुळेच संघाला शनिवारी जास्त बळींची अपेक्षा होती. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली, पण काही निर्णय आमच्या विरोधात गेले आणि त्याचाच फटका आम्हाला बसला. रविवारी पहिल्या सत्रात अधिकाधिक बळी मिळवून इंग्लंडवर दडपण आणण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे मत भारताच्या चेतेश्वर पुजाराने सामन्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
तो पुढे म्हणाला की, या सामन्यातील खेळीबद्दल मी अहमदाबादच्या खेळीपेक्षा जास्त समाधानी आहे, पण संघाला ३५० धावांचे लक्ष्य गाठता न आल्यामुळे थोडासा निराशही आहे. तळाचा फलंदाज माझ्यासमोर असल्याने माझ्यावर दडपण वाढले होते आणि त्यामुळेच फटकेबाजी करण्याच्या नादात मी बाद झालो. त्यावेळी खेळपट्टी फलंदाजीला सोपी नव्हती, पण आता खेळपट्टीचा नूर थोडासा बदललेला आहे. खेळपट्टीवर चेंडू वळतील, उसळीही मिळेल, पण खेळपट्टी संथ झाल्याचा फायदा फलंदाजांना होईल आणि आता फलंदाजांना सहजपणे फलंदाजी करता येईल.