Ind vs Eng : इंग्लंडविरुद्धच्या अंतिम कसोटीत सामन्यात आज चौथ्या दिवसअखेर भारताने ३ बाद ५८ धावांपर्यंत मजल मारली. त्याआधी इंग्लंडने दुसरा डाव ८ बाद ४२३ धावांवर घोषित केला आणि भारतापुढे ४६४ धावांचे लक्ष्य ठेवले. अनुभवी कुक आणि कर्णधार रूट यांनी शतके झळकावत २५९ धावांची भागीदारी केली. पण त्यातही इंग्लंडचा सलामीवीर आणि माजी कर्णधार अॅलिस्टर कूक याने केलेले धडाकेबाज शतक खास ठरले. त्याने या सामन्यात १४७ धावा केल्या.

पदार्पणात आणि कारकीर्दीच्या शेवटच्या सामन्यात शतक झळकावण्याची किमया कूकने साधलीच. पण या शतकाची खास गोष्ट म्हणजे त्याने हा पराक्रम भारताविरुद्धच केला. कूकने पदार्पणात आणि शेवटच्या सामन्यात केलेल्या शतकांच्याबाबतीत आणखी एक योगायोग म्हणजे ही दोन्ही शतके त्याने भारताविरुद्ध केली आहेत. २००६ मध्ये कूकने भारताविरुद्धच्या नागपूर कसोटीत पदार्पण केले होते. त्या सामन्यात त्याने नाबाद १०४ धावांची खेळी केली होती.

कूकचे आजचे शतक कसोटी कारकीर्दीतील त्याचे ३३वे शतक होते. ७६ धावांचा टप्पा ओलांडताच त्याने सर्वाधिक कसोटी धावांच्या रेकॉर्डमध्ये श्रीलंकेचा माजी कसोटीपटू कुमार संगकाराला मागे टाकत पाचवे स्थान पटकावले. संगकाराने १३४ कसोटी सामन्यांत २९१ डावांमध्ये १२ हजार ४०० धावा केल्या असून कूकने आजच्या शतकी खेळीबरोबच १२ हजार ४७२ धावांचा टप्पा गाठून आपल्या कारकीर्दीला पूर्णविराम दिला.