भारतीय संघाचा तडाखेबाज फलंदाज युसूफ पठाण याने आज निवृत्ती जाहीर केली. कसोटी, टी-२० आणि वन डे अशा क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्त होत असल्याची माहिती त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. शुक्रवारी दुपारच्या वेळेस त्याने ट्वीट केले. “मी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारत आहे. माझे कुटुंबीय, मित्रमंडळी, चाहते, संघ, प्रशिक्षक आणि माझे देशवासी या साऱ्यांचे मी आभार मानतो. त्यांनी सातत्याने दिलेल्या पाठिंब्यासाठी आणि प्रेमासाठी मी त्यांचा नेहमी ऋणी राहिन”, असं ट्वीट युसूफ पठाणने केलं. त्याचसोबत #Retirement (निवृत्ती) हा हॅशटॅगही दिला.

युसूफ पठाणने २००७ ते २०१२ या कालावधीत भारतीय संघाकडून ५७ एकदिवसीय आणि २२ टी-२० सामने खेळले. २००७च्या टी२० विश्वविजेत्या भारतीय संघात युसूफचा समावेश होता. तसेच, २०११च्या विश्वविजेत्या भारतीय चमूतही युसूफ समाविष्ट होता. युसूफने बडोदा संघाकडून स्थानिक क्रिकेट खेळले. त्याशिवाय, राजस्थान आणि कोलकाता या दोन संघांकडून त्याने IPL मध्ये दमदार कामगिरी करून दाखवली. त्यानंतर तो इतरही संघांकडून खेळला पण त्याला फारसे यश मिळवता आले नाही.