IPL स्पर्धेदरम्यान स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळलेला क्रिकेटपटू एस श्रीसंतला BCCI कडून दिलासा मिळाल्यानंतर आता तब्बल सात वर्षानंतर तो क्रिकेटच्या मैदानावर परतण्यास सज्ज झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने श्रीसंतची बाजू ऐकून घेऊन त्यावर ३ महिन्याच्या आत पुनर्विचार करण्याचे आदेश BCCI ला १५ मार्च २०१९ रोजी दिले होते. त्यानंतर लोकपाल डी. के. जैन हे श्रीसंतबद्दल निर्णय घेतील असा निर्णय BCCI ने घेतला होता. त्यानुसार २० ऑगस्ट २०१९ ला श्रीसंतवरील आजीवन बंदी हटवण्यात आली असून २०२० मध्ये त्याला क्रिकेटच्या मैदानावर परतता येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार केरळच्या रणजी संघात ३७ वर्षीय श्रीसंतला समाविष्ट करून घेण्याचा निर्णय राज्य क्रिकेट संघटनेने घेतला आहे.

२०१८ साली केरळ उच्च न्यायालयाने श्रीसंतवर BCCI कडून घालण्यात आलेली क्रिकेटबंदी उठवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने श्रीसंतला या प्रकरणात २०१९ मध्ये दोषी ठरवले पण त्याची बंदीची शिक्षा कमी करावी असेही निर्देश दिले. त्यानुसार श्रीसंतवरील बंदीचा कालावधी सप्टेंबर २०२० पर्यंत निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार सप्टेंबरनंतर सुरू होणाऱ्या रणजी हंगामासाठी केरळच्या संघात श्रीसंतला समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काय होतं प्रकरण?

श्रीसंतला २०१३ मध्ये IPL स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी मुंबईतून अटक केली होती. त्यानंतर BCCI ने श्रीसंतवर आजीवन बंदी घालण्याचा आणि १० लाख रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला होता, मात्र आजीवन बंदी घालण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे श्रीसंतने म्हटले होते. त्यानंतर २०१९ मध्ये आपण पोलिसांच्या भीतीने आपण हा गुन्हा कबूल केल्याचा दावा श्रीसंतने केला होता.

सर्वोच्च न्यायालयात श्रीसंतने दिल्ली पोलिसांनी आपल्या कुटुंबाला गोवण्याची तसेच छळ करण्याची धमकी दिल्यानेच आपण स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचा गुन्हा कबूल केला असल्याचे सांगितले होते. त्यानंतर, BCCI कडून लावण्यात आलेली बंदी अत्यंत कठोर असून आपण बेकायदेशीर गोष्टींमध्ये सहभागी होतो हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा नव्हता, असे श्रीसंतकडून न्यायाधीश अशोक भूषण आणि के एम जोसेफ यांच्या खंडपीठासमोर सांगण्यात आले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने क्रिकेटबंदीवर पुनर्विचाराचा निर्णय सुनावला होता.