टीम इंडियाने महिला टी २० विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा अटीतटीच्या लढतीत ३ धावांनी पराभव केला. सलामीवीर शफाली वर्मा (४६) आणि तानिया भाटीया (२३) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडला १३४ धावांचे आव्हान दिले होते. आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला केवळ १३० धावाच करता आल्या. भारताने या विजयासह सहा वर्षांपासून कोणत्याही संघाला शक्य न झालेला पराक्रम करून दाखवला.

२०१४ पासून न्यूझीलंडच्या संघाने १४० धावा किंवा त्यापेक्षा कमी धावांचे आव्हान ठेवलेल्या प्रत्येक सामन्यात विजय मिळवला होता. न्यूझीलंडने या कालावधीत २० टी २० सामन्यात १४० पेक्षा कमी धावा केल्या होत्या आणि त्या सगळ्या सामन्यांत न्यूझीलंडच्या संघाला विजय मिळवला होता. भारताने देखील न्यूझीलंडच्या संघाला १३४ धावांचे (१४० पेक्षा कमी) आव्हान दिले होते, पण या सामन्यात न्यूझीलंडला विजय मिळवता आला नाही.

दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने पहिला बळी लवकर गमावला. स्मृती मानधना ११ धावांवर बाद झाली. स्मृती लवकर बाद झाल्यावर शफाली वर्मा आणि तानिया भाटीया यांनी चांगली भागीदारी केली. त्यानंतर यष्टीरक्षक तानिया भाटीया (२५ चेंडूत २३ धावा) फटकेबाजी करताना झेलबाद झाली. त्यानंतरच्या फलंदाजांनी निराशा केली. मुंबईकर जेमिमा (१०), कर्णधार हरमनप्रीत (१), अनुभवी वेदा कृष्णमूर्ती(६), दिप्ती शर्मा (८) स्वस्तात बाद झाल्या. अखेर राधा यादवने फटकेबाजी करत भारताला १३३ धावांचा टप्पा गाठून दिला.

१३४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सलामीवीर प्रिस्ट १२ धावा करून माघारी परतली. पाठोपाठ अनुभवी सुझी बेट्सदेखील त्रिफळाचीत होऊन तंबूत परतली. कर्णधार सोफी डिव्हाईनही १४ धावा करून बाद झाली. त्यामुळे न्यूझीलंडची अवस्था ३ बाद ३४ झाली होती. त्यानंतर मॅडी ग्रीन आणि केटी मार्टीन यांनी डाव सावरला. या दोघींनी ४३ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. अखेर राजश्री गायकवाडने जमलेली जोडी फोडली. फलंदाज मॅडी ग्रीन २४ धावांवर बाद झाली. लगेच केटी मार्टीनही २५ धावा करून माघारी परतली. त्यानंतर अमेलिया किर हिने तुफान फटकेबाजी केली. तिने ६ चौकार लगावत १९ चेंडूत नाबाद ३४ धावा केल्या. पण एका चेंडूत ५ धावा हव्या असताना अखेर न्यूझीलंडला ३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.