News Flash

कर्णधारपदासाठी शोएब अख्तरची रोहितपेक्षा कोहलीलाच पसंती

भारतीय संघाच्या कर्णधारपदी विराट असावा की रोहित यावरून अनेक चर्चा रंगल्या आहेत.

टीम इंडियाचा ३ ऑगस्टपासून विंडीज दौरा सुरु होणार आहे. टी २० मालिकेने या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची रविवारी निवड करण्यात आली. निर्धारित षटकांसाठी वेगळा आणि कसोटी क्रिकेटसाठी वेगळा कर्णधार अशी पद्धत भारतीय संघात येणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष होते, पण तीनही प्रकारांमध्ये विराट कोहली याच्याकडेच टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धूरा सोपावण्यात आली. याबाबत माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. पण माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी गावसकर यांचं मत पटलं नसल्याचं म्हटलं. तशातच आता माजी पाक क्रिकेटपटू शोएब अख्तर याने कोहलीच योग्य कर्णधार असल्याचे म्हटले आहे.

शोएब अख्तरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आपल्या चाहत्यांच्या प्रश्नाची उत्तरे दिली. त्याने चाहत्यांना १५ मिनिटांचा अवधी दिला होता. त्यात चाहत्यांना हवे ते प्रश्न विचारण्याची मुभा होती. त्यावेळी एका चाहत्याने त्याला रोहित शर्माकडे भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधारपद द्यावे का? असा प्रश्न विचारला. त्यावर त्याची ‘गरज नाही’, असे रोखठोक उत्तर शोएबने दिले.

दरम्यान, माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी विराट कोहलीकडे कर्णधारपद देण्याच्या निर्णयावर टीका केली. निवड समितीने विराट कोहलीची कर्णधारपदी नियुक्ती करण्याआधी कोणतीही चर्चा केली होती का? असा सवाल गावसकरांनी विचारला. मिड डे या इंग्रजी वृत्तपत्रात लिहलेल्या स्तंभात त्यांनी आपले विचार मांडले. “आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघ निवडायच्या आधी, निवड समितीने कर्णधारपदासाठी बैठक बोलावणं गरजेचं होतं. माझ्या माहितीनुसार, विश्वचषकापर्यंतच विराट कोहलीकडे कर्णधारपद होतं. विश्वचषकात विराटकडून ज्या अपेक्षा केल्या जात होत्या, त्याप्रमाणे त्याची कामगिरी झालेली नाही. संघातील काही खेळाडूंना खराब कामगिरीचं कारण देत जागा नाकारण्यात आली, मग विराटने त्याच्याकडून होत असलेल्या अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आहे का?” गावसकरांनी आपलं परखड मत मांडलं.

माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांना मात्र गावसकर यांचे मत पटले नाही. “सुनील गावसकर यांचा मान राखून मी सांगतो की त्यांनी विराटचे कर्णधारपद आणि भारतीय निवड समितीबाबत मांडलेले मत मला पटलेले नाही. निवड समिती अत्यंत उत्तम प्रकारे कार्य करत आहे. विश्वचषक सामन्यात विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने खूप चांगली कामगिरी केली. विश्वचषकातील सामन्यांमध्ये भारताने ७ सामने जिंकले, तर २ सामने गमावले. त्यातीलही १ सामना अत्यंत कमी फरकाने गमवावा लागला, अशा शब्दात मांजरेकर यांनी विराटला पाठिंबा दर्शवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 12:52 pm

Web Title: team india captain virat kohli rohit sharma shoaib akhtar
Next Stories
1 पृथ्वी शॉच्या आधी ‘हे’ क्रिकेटपटू आढळले डोपिंग चाचणीत दोषी
2 ‘पृथ्वी शॉ लहान आहे, त्याला काळजीपूर्वक हाताळावं’, हर्षा भोगलेंचा सल्ला
3 निवड समिती कोहली, शास्त्री यांच्या दबावाखाली? एमएसके प्रसाद म्हणतात…
Just Now!
X