पाहुण्या इंग्लंड संघानं चेन्नई येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा २२७ धावांनी पराभव करत दौऱ्याला दणक्यात सुरुवात केली. पहिल्या सामन्यातील मानहानीकारक पराभवानंतर विराट कोहलीनं इंग्लंड संघाचं कौतुक करतानाच पुढील सामन्याासाठी इशाराही दिला आहे. सामन्यानंतर बोलताना विराट कोहली म्हणाला की, ‘आम्हाला पुनरागमन करायला येतं. पुढील सामन्यात आम्ही सर्वस्वी झोकून देऊन आमचं बेस्ट देऊ. पहिल्या सामन्यात झालेल्या चुका आम्ही सुधारु. पुढील सामन्यात मोठ्या भागीदाऱ्या करण्याचा आमचा प्रयत्न असेल. पुढील सामन्यात सकारात्मकतेनं सुरुवात करावी लागेल. तसेच इंग्लंडच्या संघावर सुरुवातीपासूनच दबाव निर्माण करावा लागेल.’

पहिल्या सामन्यात कुठे झाली चूक?
५७८ धावांचा पाठलाग करताना पहिल्या डावात निराशाजनक फलंदाजीमुळे सामन्याचे पारडे इंग्लंडच्या बाजूने झुकले. प्रतिस्पर्धी संघावर दबाव निर्णाण करण्यातही आम्हाला अपयश आलं. फलंदाजाच्या खराब कामगिरीमुळे मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. आमच्या एका फलंदाजाने जरी शतक केले असते, तरी आम्हाला झुंज देण्याची संधी निर्माण झाली असती. मात्र, पहिल्या डावात इंग्लंडला मोठी आघाडी मिळाली आणि याचा आम्हाला फटका बसला, असे कोहली म्हणाला.

आणखी वाचा- WTC फायनलमध्ये भारत कसा पोहचणार? चेन्नईतील पराभवानं बिघडलं गणित

अजिंक्य रहाणेचं समर्थन –
एकच कसोटी सामना झाला आहे, त्यामुळे राहणेच्या खराब कामगीरीवर न बोललेलं बरं. पहिल्या डावात अजिंक्य चौकार मारण्याचा प्रयत्न करत होता. जो रुटने उत्कृष्ठ झेल पकडला. जर अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात धावा केल्या असत्या तर हे बोलणे झालं नसते. आता आम्हाला पुढील सामन्यावर लक्ष देण्याची गरज आहे. एक कसोटी संघ म्हणून आम्हाला उत्कृष्ट प्रदर्शन करावं लागेल, असे कोहली म्हणाला.

आणखी वाचा- ओए मेनन; कोहलीची अंपायरकडे केलेली तक्रार व्हायरल

म्हणून नदीमला संधी
कुलदीप यादवला संधी न देण्याविषयी कोहली म्हणाला, आम्ही दोन ऑफस्पिनर्सना संघात स्थान दिले होते. कुलदीप चायनामन गोलंदाज असल्याने त्याचा चेंडूही उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या फलंदाजासाठी आत येतो. गोलंदाजीत विविधता असावी म्हणून आम्ही कुलदीपच्या जागी नदीमला संघात घेतले.