इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला एक डाव आणि १५९ धावांनी मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. या बाबत भारतीय संघावर चौफेर टीका झाली. भारतीय संघाकडून कोणत्याही प्रकारे झुंज दिसून आली नाही. याउलट भारतीय फलंदाजांनी इंग्लिश गोलंदाजांपुढे सपशेल शरणागती पत्करली. याबाबत आता बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीकडून प्रशिक्षक रवी शास्त्री यांना जाब विचारण्यात आला असल्याचे समजत आहे.

भारतीय संघाच्या फलंदाजीची दुसऱ्या कसोटीत पूर्णपणे पडझड झाली. या अतिसुमार फलंदाजीबाबत प्रशाकीय समितीने रवी शास्त्री यांना जाब विचारला आहे. दोन कसोटी सामन्यांमध्ये तयारी आणि सरावासाठी पुरेसा वेळ मिळूनही अशा प्रकारची कामगिरी होणे हे अत्यन्त अनाकलनीय आहे. अशा गोष्टी होणे म्हणजे स्वीकरण्याजोगे नाही, अशा शब्दात प्रशासकीय समितीकडून शास्त्रीबुवांची कानउघडणी करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.

भारतीय संघाला इंग्लंड दौऱ्यावर सामने सुरु होण्याच्या काही दिवस आधी पाठवण्यात आले होते. त्यांना तेथील वातावरणाशी एकरूप होण्यास वेळ देण्यात आला होता. पण असे असूनही फलंदाजांकडून आणि विशेषतः वरच्या फळीतील फलंदाजाकडून इतकी खराब कामगिरी होणे, हे समजण्याच्या पलीकडले आहे. याशिवाय, संघ दौऱ्यावरून मायदेशी परतल्यानंतर प्रशाकीय समिती भारतीय संघ निवड समितीशी बैठक घेऊन काही विषयांवर चर्चा करणार आहे, असेदेखील सूत्रांकडून इंडियन एक्स्प्रेसला संगितले आहे.