भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी सोमवारी रवी शास्त्री यांच्यासह ६ नावांची अंतिम यादी निश्चित करण्यात आली. सहा उमेदवारांमध्ये न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माइक हेसन, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू टॉम मूडी, अफगाणिस्तानचे प्रशिक्षक फिल सिमन्स, भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक लालचंद राजपूत आणि भारताचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक रॉबिन सिंग या पाच जणांचा समावेश आहे. तर शास्त्री हे सध्याच्या भारतीय संघाचे प्रशिक्षक असल्यामुळे त्यांना निवडप्रक्रियेसाठी थेट प्रवेश मिळणार आहे. या निवड प्रक्रियेबाबत BCCI ने मत व्यक्त केलं आहे.

कपिल देव यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समिती या १६ ऑगस्टला भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड करण्यासाठी मुलाखती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कपिल यांच्या समितीत माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड आणि माजी महिला क्रिकेटपटू शांता रंगास्वामी यांचा समावेश आहे. ते प्रशिक्षकाची निवड करणार आहेत.

त्याबाबत बोलताना BCCI च्या प्रशासकीय समितीचे (COA) सदस्य रवी थोडगे म्हणाले की कपिल देव यांच्या समितीवर प्रशिक्षक निवडीच्या प्रक्रियेदरम्यान कोणतेही दडपण किंवा दबाव नसेल. क्रिकेट सल्लागार समिती ही एक स्वतंत्र समिती आहे. ते स्वत: प्रशिक्षक निवडतील. BCCI च्या नियमांनुसार ही प्रक्रिया पार पाडली जाईल.

भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी सहा उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्या सहापैकीच एकाची निवड करण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

शास्त्री यांचा कार्यकाळ वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर संपणार आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात सुरू होणाऱ्या मालिकेत टीम इंडिया नव्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली मैदानावर उतरणार आहे.