ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाने सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. ४०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना भारताच्या हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विन या जोडीने शेवटपर्यंत खेळपट्टीवर तग धरला आणि सामना वाचवला. या अनिर्णित सामन्याबरोबरच भारताने कसोटी मालिकेतील १-१ ही बरोबरी कायम राखली. भारतीय संघाने या दमदार कामगिरीच्या बळावर ४० वर्षांत पहिल्यांदाच एक नवा पराक्रम केला.

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन भूमिवरील आपलाच एक विक्रम मोडीत काढला. आशियाई देशांपैकी ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर चौथ्या डावात सर्वाधिक षटकं खेळत सामना अनिर्णित ठेवण्याचा विक्रम भारताने रचला. भारतीय संघाने तब्बल १३१ षटकं खेळून काढली. याआधी भारतानेच २०१४-१५मध्ये सर्वाधिक ८९.५ षचके खेळून सामना अनिर्णित राखला होता. तर श्रीलंकेने २००४मध्ये ८५ षटकं खेळून काढत सामना अनिर्णित राखला होता. यासोबत भारताने ४० वर्षांत पहिल्यांदाच चौथ्या डावांत एवढी जास्त षटकं फलंदाजी केली. १९८० नंतर भारताला हा पराक्रम जमला नव्हता.

आणखी वाचा- व्वा पंत… काय खेळलात!! एकाच खेळीने मोडले तीन विक्रम

Video: अश्विनने केली ऑस्ट्रेलियन कर्णधाराची बोलती बंद!! दिलं भन्नाट उत्तर…

सामन्यात प्रथम ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करत ३३८ धावा केल्या. तर भारताचा पहिला डाव २४४ धावांत आटोपला. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात झटपट धावा करत भारताला विजयासाठी ४०७ धावांचे आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्माने अर्धशतक केलं. शुबमन गिल आणि अजिंक्य रहाणेला फारशी चमक दाखवता आली नाही. पण पंतने धुवाधार ९७ धावा कुटल्या. पुजारानेही ७७ धावा केल्या. पण हे दोघे बाद झाल्यावर हनुमा विहारी आणि रविचंद्रन अश्विन या दोघांनी कमाल केली. या दोघांनी सामना वाचवण्यासाठी तब्बल २५९ चेंडू म्हणजेच ४३ षटकं खेळून काढली आणि त्यात नाबाद ६२ धावांची भागीदारी केली.