संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताची कामगिरी चांगली झाली नाही, तर आपली कर्णधारपदावरून गच्छंती अटळ आहे. याची कुणकुण लागल्यामुळे विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी सांगितले.

फलंदाजीत मोठी खेळी उभारण्यात कोहली अपयशी ठरत आहे.  याचप्रमाणे कसोटीमधील वर्चस्व अबाधित राखणे आणि २०२३मध्ये मायदेशात होणाऱ्या एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषक स्पर्धेकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी विश्वचषकानंतर ट्वेन्टी-२०चा भार कमी करण्याचा निर्णय कोहलीने घेतला आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेपर्यंत कोहलीकडे या प्रकारात भारताचे नेतृत्व कायम राहणार असल्याचे ‘बीसीसीआय’ने संकेत दिले आहेत. तोवर भारत विश्वचषकाशिवाय ट्वेन्टी-२० प्रकारातील २० सामने खेळणार आहे.

खेळाचा ताण कमी करण्याचा उद्देश

खेळाचा ताण कमी करण्यासाठी ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील कर्णधारपद सोडत असल्याचे विराट कोहलीने गुरुवारी स्पष्ट केले आहे. ‘‘खेळाचा ताण समजून घेणे अतिशय महत्त्वाचे असते. गेली आठ-नऊ वर्षे तिन्ही प्रकारचे क्रिकेट खेळताना आणि पाच-सहा वर्षे नेतृत्व करताना खेळाचा ताण मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटच्या नेतृत्वासाठी स्वत:ला पूर्णत: सज्ज राखण्यासाठी मी हा निर्णय घेतला आहे,’’ असे कोहलीने म्हटले आहे. याला ‘बीसीसीआय’नेही दुजोरा दिला आहे.

रोहितकडे नेतृत्वाची धुरा?

ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील देशाचे आणि ‘आयपीएल’मधील मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करतानाची कामगिरी ही रोहित शर्माच्या पथ्यावर पडू शकते. त्यामुळे ३४ वर्षीय रोहितकडे भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचे नेतृत्व सोपवले जाऊ शकते. रोहितची देशाचे नेतृत्व करतानाची कामगिरी ही कोहलीपेक्षा सरस आहे. याशिवाय त्याने पाच वेळा मुंबई इंडियन्सला ‘आयपीएल’ चषक जिंकून दिला आहे. नोव्हेंबर महिन्यात न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर तीन ट्वेन्टी-२० सामन्यांसह दोन कसोटी सामने खेळणार आहे. या वेळी ट्वेन्टी-२०मध्ये नवा कर्णधार भारताचे नेतृत्व करणार आहे. तसेच उपकर्णधारपदासाठी ऋषभ पंत, के. एल. राहुल आणि जसप्रित बुमरा हे तीन पर्याय उपलब्ध आहेत.

कोहली हा ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक १४२१ धावा काढणारा भारतीय कर्णधार आहे. ट्वेन्टी-२० क्रिकेट कर्णधारांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे.

ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये कोहली हा भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने २७ विजय मिळवले आहेत, तर सर्वाधिक ४२ विजय महेंद्रसिंह धोनीच्या नावावर आहेत.

सर्वाधिक विजय मिळवून देणाऱ्या जागतिक कर्णधारांच्या यादीत कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. असगर अफगाण, धोनी आणि ईऑन मॉर्गन हे पहिल्या तीन क्रमांकांवर आहेत.

कर्णधार म्हणून सर्वात वेगाने एक हजार धावा करण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर आहे. त्याने फक्त ३० डावांमध्ये हा टप्पा गाठला होता.

‘सेना’ म्हणजेच दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांच्या भूमीवर द्विराष्ट्रीय मालिका जिंकणारा कोहली हा भारताचा एकमेव कर्णधार आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्ध (२०२०) ५-० तर ऑस्ट्रेलिया (२०२०), इंग्लंड (२०१८) आणि दक्षिण आफ्रिका यांच्याविरुद्ध प्रत्येकी २-१ अशा फरकाने संघाला जिंकून दिले.