भारतीय संघाने ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक कसोटी मालिका विजय मिळवला. १-१ अशा बरोबरीत असलेल्या कसोटी मालिकेत चौथा सामना भारताने जिंकला आणि यजमानांचा अबाधित गड सर केला. त्या सामन्यात अनेक खेळाडूंनी महत्त्वाची भूमिका बजावली. पण संपूर्ण मालिकेत भारतासाठी अभेद्य भिंत बनून उभा राहिला तो चेतेश्वर पुजारा. त्याने चौथ्या डावात ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा मारा शरीरावर झेलत २००हून अधिक चेंडू खेळले. त्याच्या चिवट खेळीपुढे ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा माराही फिका पडला. आता इंग्लंडविरूद्ध भारतीय संघाची कसोटी मालिका ५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या आधी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने पुजाराला एक आव्हान दिलं आहे.

रविचंद्रन अश्विन आणि टीम इंडियाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्यात युट्यूबमार्फत गप्पा रंगल्या होत्या. त्यावेळी पुजाराचा विषय निघाला. पुजाराबाबत बोलताना विक्रम राठोड म्हणाले, “मी पुजाराला अनेकदा सांगतो की पायांचा वापर करून पुढे ये आणि डोक्यावरून हवेत फटका मार. कमीतकमी एकदा तरी मी सांगतोय तसा प्रयत्न कर. पण तो दरवेळी मला वेगळी कारणं देतो. कारण तो अद्यापही माझं म्हणणं मान्य करत नाहीये.”

यावर बोलताना अश्विनने एक भन्नाट आव्हान पुजाराला दिलं. “आता सुरू होणाऱ्या इंग्लंडविरूद्धच्या कसोटी मालिकेत जर पुजाराने पायांचा वापर करून पुढे येऊन मोईन अली किंवा कोणत्याही फिरकीपटूला हवाई फटका खेळून दाखवला तर मी माझी अर्धी मिशी उडवून टाकेन आणि तसाच मैदानावर खेळण्यासाठी हजर होईन”, असं अश्विन म्हणाला.

“हे आव्हान खरंच खूप रंजक आहे. मला वाटतं की पुजाराने हे आव्हान आता तरी स्वीकारायला हवं. पण खरं पाहता मला विश्वास आहे की तो असली आव्हानं स्वीकारणार नाही”, असं हसत-हसत राठोड म्हणाले.

दरम्यान, आज चेतेश्वर पुजाराचा वाढदिवस आहे. पुजाराने ३४व्या वर्षात पदार्पण केले. पुजाराने भारतासाठी ८१ कसोटी सामने खेळून त्यात ६ हजार १११ धावा केल्या आहेत. त्याने कसोटीत १३ हजार ५७२ चेंडू खेळून काढले आहेत. तसेच १८ शतकं ठोकली आहेत. भारतीय संघाचा ‘आधारस्तंभ’ म्हणून BCCIने त्याचा गौरवही केला आहे.