विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर ८९ धावांनी मात केली. पाकिस्तानने टॉस जिंकल्यावर क्षेत्ररक्षण स्वीकारलं. भारताने ३३६ धावा करून पाकिस्तानसमोर ३३७ धावांचं लक्ष्य ठेवलं. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरूवात काहीशी चांगली झाली नाही. ३५ व्या षटकानंतर पावसाने हजेरी लावली. या दरम्यान वेळ वाया गेल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार सुधारित लक्ष्य देण्यात आलं. ज्यानुसार पाकिस्तानला पाच षटकांमध्ये १३६ धावा करणं भाग होतं. हे आव्हान पाकिस्तानी संघाला पेलवलं नाही आणि भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानवर विजय मिळवला. ज्यानंतर देशभरात दिवाळीचं वातावरण पाहण्यास मिळालं.

पंजाबमधील अमृतसर या ठिकाणी फटाके उडवून आणि फुलबाज्या पेटवून आनंद साजरा केला. लखनऊमध्येही फटाके फोडून आणि टीम इंडियाच्या विजयाच्या घोषणा देऊन आनंद व्यक्त करण्यात आला. बेंगळुरूमध्येही पाकिस्तानवर भारताने जो विजय मिळवला त्यानिमित्ताने फटाके उडवून उत्साहाने विजय साजरा करण्यात आला. कानपूरमध्येही तिरंगा हाती घेऊन आणि फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला. दिल्लीतही तरूणांनी तिरंगा हाती घेऊन टीम इंडियाच्या नावे थ्री चिअर्सच्या घोषणा दिल्या आणि आनंद व्यक्त केला.

मुंबईत ढोल ताशे वाजवून आणि नाच करत लोकांनी टीम इंडियाचा पाकिस्तानवरचा विजय साजरा केला. नागपुरातही भलामोठा तिरंगा हाती घेऊन तरूणाईने जल्लोष साजरा केला आणि टीम इंडियाचा जयघोष केला. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचे संघ एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. या दोन देशांमधला क्रिकेटचा सामना एखाद्या युद्धापेक्षा कमी नसतो. त्याचमुळे हा सामना भारताने जिंकल्यावर लोकांचा आनंद द्विगुणित झाला. रात्रभर देशात दिवाळीचं वातावरण या विजयी जल्लोषानंतर पाहण्यास मिळालं.