३० मे पासून इंग्लंडमध्ये सुरु होणारी विश्वचषक स्पर्धा आता अवघ्या महिन्याभरावर येऊन ठेपली आहे. गतवर्षात भारतीय संघाची कामगिरी पाहता, विराट कोहलीचा संघ विश्वचषक विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. श्रीलंकेचा माजी जलदगती गोलंदाज चमिंडा वासनेही, भारतीय संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत नक्की पोहचेल असं मत व्यक्त केलं आहे. तो पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलत होता.

अवश्य वाचा – देशासाठी धोनीइतकं योगदान कोणत्याही खेळाडूने दिलं नाही – कपिल देव

“गेली २-३ वर्ष भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण करुन आहे. त्यांच्याकडे जलदगती गोलंदाजीचे पर्यायही चांगले उपलब्ध आहेत. ते कधीही तुम्हाला मैदानात चकीत करु शकतात. भारताचा संघ समतोल आहे, तो नक्की चांगली कामगिरी करेल. माझ्या अंदाजाप्रमाणे भारतीय संघ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत नक्की पोहचेल.” चमिंडा वासने आपला अंदाज वर्तवला.

अवश्य वाचा – IPL 2019 : विश्वचषकात निवड न झाल्याचं शल्य मनात होतंच – ऋषभ पंत

३० मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषक संघासाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या संघात धोनीला पर्याय म्हणून निवड समितीने पंत ऐवजी कार्तिकला पसंती दिली. या निर्णयावर अनेक माजी खेळाडू आणि चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. ५ जूनला भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.