आगामी हंगामात भारतीय संघातील अव्वल दर्जाचे खेळाडू आणि देशांतर्गत क्रिकेटपटूंचे वेतनामध्ये दुप्पट वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. सध्याच्या घडीला क्रिकेटपटूंसाठी १८० कोटींचा निधी असून त्यामध्ये २०० कोटीपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या क्रिकेट प्रशासकांची समिती यावर विचार करत असून, लवकरच यांसंदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय खेळाडूंच्या मानधनाच्या पटीत रणजी खेळाडूंच्या मानधनात वाढ करण्यासंदर्भात प्रशासकिय समिती सकारात्मक आहे.
संघातील सिनिअर आणि ज्यूनिअर खेळाडूंच्या मानधनाच्या आराखड्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी बीसीसीआयच्या पदाधिका-यांसमोर ठेवण्यात येणार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी खेळाडूंच्या वेतनवाढीची मागणी उचलून धरली होती. सध्याच्या घडीला बीसीसीआयच्या नफ्यातील २६ टक्के वाटा खेळाडूंना देण्यात येतो. यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना १३ टक्के तर रणजी मैदानात उतरणाऱ्या खेळाडूंना १० टक्के वाटा दिला जातो. उर्वरित ३ टक्के वाटा महिला आणि ज्यूनिअर क्रिकेटपटूंना मिळतो.
त्यानुसार रणजी खेळाडूंना १२ ते १५ लाख रुपये मिळतात. राष्ट्रीय संघातील क्रिकेटपटूंना शंभर टक्के वाढ मिळाली तर तितकीच वेतनवाढ रणजी क्रिकेटपटूंना मिळण्याची शक्यता आहे. नव्या प्रस्तावानुसार रणजी क्रिकेटपटूंना वर्षाला ३० लाख रुपये मानधन मिळू शकेल. अ श्रेणीतील खेळाडूंना सर्वाधिक मानधन, ब श्रेणीतील खेळाडूंना त्या खालोखाल तर क श्रेणीतील खेळाडुंना कमी मानधन देण्याची तरतूद आहे. यापूर्वी एप्रिल २०१७ मध्ये भारतीय क्रिकेटपटूंना वार्षिक पगार म्हणून मिळणारी रक्कम ही जगातील इतर क्रिकेटपटूंना मिळणाऱ्या रकमेपेक्षा कमी होती, असं सांगत विराटनं यात वाढ करण्याची मागणी केली होती.याशिवाय खेळाडूंना बोनस देखील मिळायला हवा, असा मुद्दा भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी मांडला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 15, 2017 7:03 pm