कर्णधार विराट कोहली, उप-कर्णधार रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी झळकावलेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात विंडीजवर मात केली. विजयासाठी दिलेलं ३१६ धावांचं आव्हान ४ गडी राखत पूर्ण करत भारताने ३ सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली. रोहित आणि राहुल जोडीने पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली होती. मात्र मधल्या फळीत फलंदाजांनी हाराकिरी केल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. मात्र आधी विराट कोहली आणि त्यानंतर रविंद्र जाडेजा आणि शार्दुल ठाकूर जोडीने फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला.

अवश्य वाचा – तुला मानलं रे ठाकूर ! मुंबईकर शार्दुलची विराटकडून मराठीतून स्तुती

या विजयासह टीम इंडियाने वन-डे क्रिकेटमध्ये आणखी एक विक्रम प्रस्थापित केला आहे. ३०० किंवा त्यापेक्षा अधिक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याची भारतीय संघाची ही १९ वी वेळ ठरली. महत्वाची गोष्ट म्हणजे या निकषामध्ये इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यासारखे दिग्गज संघ भारताच्या जवळपासही नाहीयेत.

२०१९ वर्षातला भारतीय संघाचा हा अखेरचा सामना होता. यानंतर नवीन वर्षात भारतीय संघ घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध टी-२० आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होईल. २०२० वर्षातला भारतीय संघाचा हा पहिला परदेश दौरा असणार आहे. २०१९ वर्षाची अखेर भारतीय संघाने मालिका विजयाने केली आहे, त्यामुळे २०२० वर्षाची सुरुवात भारतीय संघ कशी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – IND vs WI : रोहित शर्माचा डबल धमाका, कर्णधार विराटसह माजी प्रशिक्षकांनाही टाकलं मागे