16 October 2019

News Flash

दोन स्थानांसाठी चार पर्यायांचा पेच!

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी आज भारताची संघनिवड

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी आज भारताची संघनिवड

मुंबईत सोमवारी होणाऱ्या राष्ट्रीय निवड समितीच्या बैठकीनंतर आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठीचा भारतीय संघ जाहीर करण्यात येणार आहे. संघातील १३ खेळाडू जवळपास निश्चित मानले जात असून, उर्वरित दोन स्थानांसाठी राखीव यष्टीरक्षक, चौथ्या क्रमांकाचा फलंदाज, अष्टपैलू फिरकी गोलंदाज आणि अतिरिक्त वेगवान गोलंदाज असे चार पर्याय उपलब्ध आहेत.

इंग्लंडमध्ये ३० मेपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकासाठी गेल्या वर्षभरात भारतीय संघातील प्रमुख खेळाडूंचा योग्य समन्वय साधण्यात आला असून, फक्त स्थानच निश्चित व्हायचे बाकी आहे, असे संकेत भारताचा कर्णधार विराट कोहलीने मायदेशात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर दिले होते.

भारतीय संघात लोकेश राहुलचे स्थान नक्की असेल. कारण तिसरा सलामीवीर, चौथ्या स्थानासाठीचा फलंदाज आणि यष्टीरक्षण तो करू शकतो. सध्या ‘आयपीएल’मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना त्याने एकूण ३३५ धावा केल्या आहेत आणि यष्टीरक्षणाची जबाबदारीसुद्धा तो सांभाळत आहे. राहुलकडे निवड समितीने दुसरा यष्टीरक्षक म्हणूनसुद्धा पाहिले तर चौथ्या स्थानासाठी अंबाती रायुडूचा गांभीर्याने विचार होऊ शकतो.

‘‘महेंद्रसिंह धोनीला दुखापत झाली तरच दुसऱ्या यष्टीरक्षकाला संधी मिळू शकेल. पंतकडे गुणवत्ता आहे, परंतु एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याला संघात स्थान मिळवणारी कामगिरी दाखवता आलेली नाही,’’ असे मत भारताच्या एका माजी क्रिकेटपटूने व्यक्त केले आहे.

‘‘सध्याच्या निवड समितीच्या धोरणांमध्ये सातत्य आहे. त्यामुळे अंतिम १५ खेळाडूंमध्ये आश्चर्यकारक नवा चेहरा दिसण्याची शक्यता कमी आहे. १९९९ मध्ये अमेय खुरासिया आणि २००३ मध्ये दिनेश मोंगिया या नव्या खेळाडूंना थेट विश्वचषकासाठी संधी मिळाली होती,’’ असे त्यांनी पुढे सांगितले.

संभाव्य भारतीय संघ (१३ खेळाडू)

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, विजय शंकर, कुलदीप यादव, यजुर्वेद्र चहल, जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.

पर्याय १ – राखीव यष्टीरक्षक

१४व्या राखीव यष्टीरक्षकाच्या स्थानासाठी अनुभवी दिनेश कार्तिक आणि युवा ऋषभ पंत यांच्याबाबत प्रामुख्याने चर्चा होऊ शकते. सध्या चालू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये पंतच्या खात्यावर २२२ धावा जमा आहेत, तर कार्तिकने फक्त ९३ धावा केल्या आहेत. डावखुऱ्या पंतकडे १ ते ७ पैकी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्याची क्षमता आहे. जबाबदारीने फलंदाजी करून संघाला विजय मिळवून देऊ शकतो. परंतु फिरकी गोलंदाजाला यष्टीरक्षण करताना पंतने सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. मात्र गेल्या वर्षभरात कार्तिकने निवड समितीचे लक्ष वेधण्याइतपत प्रभावी कामगिरी दाखवलेली नाही. पण तरीही परंतु काही वैशिष्टय़ांमुळे कार्तिक पंतपेक्षा वरचढ ठरू शकतो. ‘आयपीएल’मधील प्रशिक्षक रिकी पाँटिंग (दिल्ली कॅपिटल्स) आणि जॅक कॅलिस (कोलकाता नाइट रायडर्स) यांनी अनुक्रमे पंत आणि कार्तिक यांच्या कामगिरीविषयी अनुकूल प्रतिक्रियाच व्यक्त केली आहे.

पर्याय २ – चौथ्या स्थानाचा फलंदाज

नोव्हेंबर २०१८पर्यंत रायुडूला चौथ्या क्रमांकाचा निश्चित फलंदाज मानत होते. परंतु नंतर त्याला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. त्याने देशांतर्गत क्रिकेटमधील रणजी क्रिकेटला अलविदा केला. तसेच वेगवान मारा खेळतानाचे त्याचे खराब तंत्र उघडे पडले. पण निवड समितीने विजय शंकरला चौथा फलंदाज गृहीत धरल्यास रायुडूच्या आशा मावळतील. गेले वर्षभर सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या मुंबईच्या श्रेयस अय्यरला योग्य पद्धतीने आजमावले असते तर चौथ्या स्थानासाठी तो भक्कम दावेदार ठरला असता. सध्या ‘आयपीएल’मध्येही त्याच्या खात्यावर २२१ धावा आहेत.

पर्याय ३ – वेगवान गोलंदाज

इंग्लंडमधील वातावरण हे वेगवान गोलंदाजांना अनुकूल असते. या पाश्र्वभूमीवर चौथ्या विशेषज्ञ वेगवान गोलंदाजाला संघात स्थान दिले जाऊ शकते. सध्या तरी हार्दिक पंडय़ा आणि विजय शंकर हे अष्टपैलू पर्याय उपलब्ध आहेत. परंतु अखेरच्या स्थानासाठी उमेश यादव, खलील अहमद, इशांत शर्मा आणि नवदीप सैनी हे पर्याय असतील. उमेशमध्ये सातत्याचा अभाव आहे. डावखुऱ्या खलीलमध्ये परिपक्वतेचा अभाव आहे. इंग्लंडमधील कामगिरी हे इशांतचे बलस्थान आहे, तर नवदीप हा ‘पॉवरप्ले’मध्ये फलंदाजांना जखडून ठेवू शकतो.

पर्याय ४ – अष्टपैलू फिरकी गोलंदाज

रवींदरि जडेजाकडे अष्टपैलू कामगिरी करण्याची क्षमता आहे. मोठे फटके खेळण्यात वाकबदार आणि कोरडय़ा खेळपट्टय़ांवर प्रतिस्पर्धी फलंदाजांवर अंकुश ठेवू शकणारा जडेजा या संघात स्थान मिळवू शकतो.

First Published on April 15, 2019 1:26 am

Web Title: team india for world cup 2019