भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ४० कसोटी सामने खेळलेले माजी सलामीवीर चेतन चौहान यांनी १९७० च्या दशकात सुनील गावसकर यांच्यासह असंख्य कसोटींमध्ये संघाला भक्कम सलामी मिळवून दिली. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील ही यशस्वी सलामीवीरांच्या जोडींपैकी एक जोडी आहे. माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्रा याने चेतन चौहान याच्यासंबंधी ट्विट करत माहिती दिली. “चेतन चौहान जी हे देखील करोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत. ते लवकर बरे व्हावेत हीच सदिच्छा. ही (शनिवारची) रात्र खूपच कठीण आहे. बिग बी आणि चेतन जी… दोघेही लवकर तंदुरूस्त व्हा”, असे ट्विट त्याने केले.

चेतन चौहान हे कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिले खेळाडू होते. ज्यांनी शतकाशिवाय २००० पेक्षा जास्त धावांचा टप्पा गाठला होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांची कामगिरी जबरदस्त होती. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी एक लढवय्या खेळाडू म्हणून नावलौकिक मिळवला होता. गावस्कर यांच्यासोबत सलामीला खेळताना या दोघांनी ३०२२ धावा केल्या. त्यापैकी दहा वेळा त्यांनी शतकी सलामी दिली. चौहान यांनी आपल्या कारकीर्दीत २०८४ धावा केल्या. तसेच, त्यांनी सात एकदिवसीय सामनेही खेळले.

१९९०च्या दशकात चौहान लोकसभेचे खासदार होते. सध्या ते उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री आहेत.चेतन चौहान यांची शुक्रवारी करोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी ते पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. सध्या त्यांना लखनऊच्या संजय गांधी पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे.