मागील आठवडय़ात भारतीय संघाला दोन मोठे धक्के बसले. तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने २६६ धावांनी दणदणीत विजय मिळवला, तर आयसीसीने नियुक्त केलेल्या न्यायआयुक्तांनी जेम्स अँडरसन निर्दोष असल्याचा निर्वाळा दिला. त्यामुळे ओल्ड ट्रॅफर्डला चौथ्या कसोटी सामन्याच्या अग्निदिव्याला सामोरे जाताना महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला सावरण्याची नितांत आवश्यकता आहे. अँडरसन प्रकरणाच्या निर्णयामुळे पदरी पडलेली निराशा कायम आहे. परंतु काही खेळाडूंना इंग्लिश भूमीवर अद्याप सूर गवसलेला नाही, त्यांना आणखी एक शेवटची संधी द्यावी की या खेळाडूंना दूर ठेवावे, हा पेच भारतीय संघासमोर आहे.
भारतीय संघात दोन महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. धावांसाठी झगडणाऱ्या सलामीवीर शिखर धवन आणि चुकीच्या फटक्यांची निवड करून बाद होणाऱ्या मधल्या फळीतील रोहित शर्माला वगळण्याची चिन्हे आहेत. याऐवजी अनुभवी सलामीवीर गौतम गंभीर आणि ऑफ-स्पिनर आर. अश्विन यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मैदानावरील खराब कामगिरी आणि मैदानाबाहेरील गमावलेली लढाई यामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी करणाऱ्या भारताला आत्मविश्वासाने कामगिरी करावी लागणार आहे.
२००७-०८च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाने गांभीर्याने भूमिका घेत दौरा अध्र्यावर सोडून मायदेशी परतण्याची धमकी दिली होती. यावेळी मात्र परिस्थिती अजून हाताबाहेर गेलेली नाही. अनिल कुंबळेने पर्थच्या कसोटीत भारताला ७२ धावांनी संस्मरणीय विजय मिळवून दिला होता. कुंबळेप्रमाणेच धोनीसुद्धा आघाडीवर राहून नेतृत्व करण्यात तरबेज आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि इंग्लंड क्रिकेट मंडळ एकीकडे समझोत्याच्या प्रयत्नात असताना धोनी मात्र जडेजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आता मालिकेत आघाडी मिळवण्यासाठी हीच कामगिरी मैदानावरसुद्धा होण्याची गरज आहे.
ट्रेंट ब्रिज आणि लॉर्ड्स कसोटीत भारताने पाच गोलंदाजांचा मारा केला होता. ट्रेंट ब्रिज कसोटी अनिर्णीत आणि लॉर्ड्सला विजय मिळवल्यामुळे ही संघरचना भारतासाठी अनुकूल ठरत असल्याची साक्ष मिळत आहे. साऊदम्पटनच्या तिसऱ्या कसोटीत सात फलंदाजांनी दोन्ही डावांमध्ये अनुक्रमे ३३० आणि १७८ धावा केल्या. याच पाश्र्वभूमीवर भारताला पुन्हा जुन्या संघरचनेकडे जावे लागणार आहे. रोहित शर्माच्या फलंदाजीत सातत्याचा अभाव जाणवतो आहे. त्यामुळे सातव्या फलंदाजाची मुळीच आवश्यकता नसल्याचे सिद्ध झाले आहे.
इंग्लंड दौऱ्यावर अश्विनला प्रथमच संधी मिळण्याची शक्यता आहे. कारण फिरकीचा आणखी एक पर्याय आणि अतिरिक्त फलंदाज ही त्याच्यात खुबी आहे. कसोटी क्रिकेटमध्ये दोन शतके त्याच्या नावावर आहेत. याचप्रमाणे पहिल्या स्लिपमध्ये त्याचे क्षेत्ररक्षणसुद्धा कौतुकास्पद असते.
संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/यष्टिरक्षक), शिखर धवन, मुरली विजय, गौतम गंभीर, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, स्टुअर्ट बिन्नी, आर. अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, ईश्वर पांडे, पंकज सिंग, वरुण आरोन, नमन ओझा.
इंग्लंड : अ‍ॅलिस्टर कुक (कर्णधार), मोइन अली, जेम्स अँडरसन, गॅरी बॅलन्स, इयान बेल, स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस जॉर्डन, जोस बटलर (यष्टीरक्षक), सॅम रॉबसन, जो रूट, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स, स्टीव्ह फिन.
* वेळ : दुपारी ३.३० वा.पासून.
* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स.