ट्वेन्टी-२० विश्वचषकातील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ४७ धावांनी पराभव केला. फिरकीला अनुकूल असणाऱ्या नागपूरच्या खेळपट्टीवर किवी संघाला जेरबंद करण्याचे मनसुबे भारताने आखले होते. न्यूझीलंडला सव्वाशेच्या आसपास रोखल्यानंतर भारताला अर्धी लढाई जिंकल्यासारखे वाटत होते. परंतु भारताने रचलेल्या चक्रव्यूहात तेच अडकले. भारताच्या या पराभवाची पाच कारणे…

१. नागपूरची खेळपट्टी फिरकी गोलंदाजीला पोषक आहे, हे माहिती असूनही भारताने तीनऐवजी दोनच फिरकी गोलंदाज खेळवले. याउलट न्यूझीलंडने वेळीच खेळपट्टीचा नूर ओळखून तीन फिरकीपटू खेळवले. त्यामुळे भारतीय संघ स्वत:च रचलेल्या चक्रव्यूहात अडकला.

२. न्यूझीलंडने समोर ठेवलेले लक्ष्य आवाक्यात असतानाही भारतीय फलंदाज वायफळ फटके मारून बाद झाले. मोठे फटके मारण्याऐवजी मैदानावर उभे राहून भागीदारी रचण्यावर भारतीय फलंदाजांनी भर देणे महत्त्वाचे होते.

३. भागीदारीचा अभाव- एकापेक्षा एक सरस फलंदाज संघात असतानाही भारतीय खेळाडुंना चांगली भागीदारी रचता आली नाही. सुरूवातीच्या विकेट झटपट गमावल्यानंतर युवराज, रैना यांनी चांगली भागीदारी रचणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी साफ निराशा केली.
४. नाणेफेकीचा कौल- या सामन्यात नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडसाठी खूपच फायदेशीर ठरला. फिरकीला पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरतो. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून नेमके तेच केले.

५. भारताच्या फिरकी गोलंदाजीची मदार असणाऱ्या आर. अश्विनचे या सामन्यातील अपयश निश्चितच भारताच्या पराभवासाठी कारणीभूत ठरले. अश्विनच्या चार षटकांत न्यूझीलंडच्या फलंदाजांनी ३२ धावा कुटल्या. ( आकडेवारी आणि खेळपट्टीचा नूर पाहता फलंदाजांप्रमाणेच अश्विन देखील पराभवाचा मोठा वाटेकरी आहे)

फिरकी चक्रव्यूहात भारतच जेरबंद