चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पाकिस्तानकडून दारूण पराभव झाला. या पराभवाची कारणे काय आहेत हे अनेकजण शोधत आहेत. मात्र आम्हाला एक कारण सापडले आहे. पराभवाचे हे ठोस कारण असू शकते अशी शक्यता आहे. होय आम्ही तुम्हाला सांगतोय झैनाब अब्बास या क्रीडा पत्रकाराबाबत. पाकिस्तानी टीव्हीसाठी झैनाब काम करते. तिच्यासोबत ज्या टीमचा प्लेअर किंवा कर्णधार सेल्फी काढतो ती टीम हरते अशी एक सुरस कथा सोशल मीडियावर ट्रेंड होते आहे. यामधली सत्यता पडताळून पहावी लागेल. पण आश्चर्याची बाब म्हणजे झैनाबने ज्या खेळाडूंसोबत फोटो काढले आहेत, ते खेळाडू एकतर शून्यावर बाद झालेत किंवा त्यांना मोठी खेळी करता आली नाही. तसेच पाकिस्तानसोबत सामना असताना झैनाबने प्रतिस्पर्धी खेळाडूंसोबत सेल्फी काढला तो संघ हरला आहे. आजही तसेच घडले. युवराज सिंग आणि विराट कोहलीसोबत झैनाबने सेल्फी काढला. आता हे दोन सेल्फीच टीम इंडियाच्या पराभवाचे कारण असल्याची बाब समोर येताना दिसते आहे.

पाकिस्तान टीमने आजच्या सामन्यात फलंदाजी करताना ३३८ धावांचा डोंगर रचत भारतासमोर ३३९ धावांचे लक्ष्य ठेवले. भारताचा डाव सुरू झाला तेव्हा एक-एक खेळाडू पटापट बाद होत तंबूत परतताना दिसले. एवढेच नाही तर १५८ धावांमध्ये भारतीय संघ बाद झाला. या दारूण पराभवाला झैनाबसोबत काढलेला सेल्फी कारणीभूत होता असा एक विषय आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तसेच झैनाबने युवराज आणि विराटसोबत काढलेले सेल्फीही व्हायरल होत आहेत. त्यामुळे झैनाब ही तिच्या पत्रकारीतेपेक्षा तिच्या सोबत खेळाडूंनी काढलेल्या सेल्फीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलीये.