२०१९ साली बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याच्या पुढाकारामुळे भारताने आपला पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळला. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर भारतीय संघाने बांगलादेशचा धुव्वा उडवला. यानंतर टीम इंडिया नवीन वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही एक दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार आहे. सौरव गांगुलीने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

अहमदाबादमध्ये तयार होत असलेल्या सरदार पटेल या मैदानालाही दिवस-रात्र कसोटी सामन्याचं यजमानपद भूषवण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. जगातल्या सर्वात मोठ्या स्टेडियमचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हस्ते होणार आहे. आगामी वर्षात भारत आणि इंग्लंड यांच्यात दिवस-रात्र कसोटी सामना या मैदानावर खेळवला जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या वरिष्ट अधिकाऱ्यांच्या बैठकीत यावर चर्चा झाल्याचं समजतंय. पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे.

अवश्य वाचा –  बुमराहच्या क्षमतेवर शंका घेणं चुकीचं – मोहम्मद शमी

याआधीही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्याची इच्छा दर्शवली होती. मात्र त्यादरम्यान बीसीसीआयमध्ये बदलांचे वारे वाहत असल्यामुळे, बोर्डाने याला नकार दिला. टी-२० विश्वचषकानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियात कसोटी आणि वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी थांबणार आहे.

अवश्य वाचा – भारताविरुद्ध कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडच्या संघाची घोषणा