टीम इंडियाचे चाहते असं म्हणतात की टीम इंडिया धावांचा पाठलाग करताना सहज जिंकते. त्यात विराट असला तर जिंकण्याची शक्यता आणखी बळावते. हेच पुन्हा सत्यात उतरलं आहे. न्यूझीलंड विरोधातील पाच टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात विराट कोहलीच्या टीमनं पुन्हा हे दाखवून दिलं… तेही एका षटकात. सुपर ओव्हरमध्ये अख्खी मालिकाच खिशात घातली. आणि थोड्याच वेळात विराटनं टि्वट केल… असं जिंकतो आम्ही…!

या टि्वटसोबत त्याने चार फोटोही सोशल मीडियावर टाकले. हातातून निसटलेला सामना टाय झाला तेव्हाचा जल्लोष, विराटनं स्वतः केलेली फटकेबाजी, रोहित शर्मा-के.एल. राहुल या जोडीच्या जल्लोषाचा फोटो आणि सामन्याच्या सुरूवातीला राष्ट्रगीतासाठी रांगेत उभे असतानाचा फोटो त्यानं सगळ्यांना शेअर केला. हे फोटोच विराटसेनेच्या आणि विराटच्या विजयाचं गमक सांगून जातात.

सामन्यानंतर विराट म्हणाला…
न्यूझीलंड ज्या पद्धतीनं खेळतंय ते बघता ते विजयाचे मानकरी आहेत, असं मी प्रशिक्षक रवी शास्त्री यांना म्हटलं होतं. कारण तेव्हा वाटलं होतं सामना हातून गेलाय. अशा शब्दांत व्यक्त होत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यानं आपल्या मनातली भीती व्यक्त करून दाखवली. पण, सुपर ओव्हरमध्ये गेलेला सामना रोहितच्या दोन सिक्सरच्या जोरावर भारतानं जिंकला आणि टीम इंडियासह चाहत्यांनीही जल्लोष केला.

सामना जिंकल्यानंतर विराट कोहली म्हणाला की, शमीने दोन चेंडू निर्धाव टाकले आणि वाटलं आता आपण सुपरओव्हरमध्ये हा सामना नेऊ शकतो. न्यूझीलंडला जिंकण्यासाठी एका चेंडूत एक धाव हवी होती, तेव्हा त्रिफळा उडवला तरच कुठे काही शक्य होईल. झालंही तसंच. सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.

सुपरओव्हरबद्दल विराट म्हणाला की, डेथ ओव्हरचा बादशाह असलेल्या बुमराहच्या गोलंदाजीवर केन विल्यमसनने जोरदार फटकेबाजी केली. पण त्यानंतर रोहितने कमाल केली.