टीम इंडिया आणि आयपीएलमधील सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी. नटराजनवर मंगळवारी गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली. नटराजनने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली. ”आज माझ्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे. तज्ञ, सर्जन, डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय पथकाचे कर्मचारी यांनी लक्ष दिल्यामुळे मी आभारी आहे. बीसीसीआय आणि ज्यांनी माझ्या बरे होण्याची प्रार्थना केली मी त्या सर्वांचा आभारी आहे”, असे नटराजनने ट्विट केले.

 

बीसीसीआयने नटराजनला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. गुडघ्याच्या दुखापतीमुळे नटराजनला यंदाच्या आयपीएलमधून बाहेर व्हावे लागले. ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यापासून नटराजन या दुखापतीशी झुंज देत आहे. नटराजनने इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत भाग घेतला आणि त्यानंतर आयपीएलमध्ये दोनच सामने खेळले. व्यस्त क्रिकेट कार्यक्रमामुळे नटराजन दुखापतीतून पूर्णपणे सावरू शकला नाही.

IPL सोडल्यानंतर नटराजन भावूक

आयपीएल २०२१मधून बाहेर पडल्यावर नटराजन अजिबात खूष नव्हता. सनरायझर्स हैदराबादने सोशल मीडिया अकाउंटवर नटराजनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो म्हणाला, ”आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये न खेळल्याबद्दल मला वाईट वाटते. गेल्या मोसमात मी चांगला खेळलो होतो आणि त्यानंतर मी भारताकडून खेळलो, म्हणून माझ्या अपेक्षा खूप जास्त होत्या. या मोसमातील प्रत्येक सामना सनरायझर्सने जिंकण्याची माझी इच्छा आहे. शुभेच्छा.”