करुण नायर आणि मुरली विजय यांना भारतीय संघात जागा न मिळाल्यामुळे दोन्ही खेळाडूंनी निवड समितीकडून आपल्याला योग्य ती माहिती मिळत नसल्याचं म्हटलं होतं. आपल्याला संघात जागा का मिळाली नाही याचं योग्य कारण निवड समितीने दिलं नसल्याचं दोन्ही खेळाडूंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. खेळाडूंचे हे आरोप निवड समितीने फेटाळले असले, तरीही या वादाची दखल आता बीसीसीआयने घेतलेली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी, आपण या वादात पडणार नसल्याचं म्हटलं आहे. हिंदुस्थान टाईम्स या वृत्तपत्राला विनोद राय यांनी खास मुलाखत दिली आहे. “सध्यातरी क्रिकेट प्रशासकीय समिती या वादामध्ये पडू शकत नाही. मात्र निवड समिती आणि खेळाडूंमध्ये संभाषण होत नाहीये असं आम्हाला अजिबात वाटत नाही. निवड समिती आणि खेळाडू हे दोघेही लहान मुलं नाहीयेत, त्यामुळे प्रत्येक बाब प्रशासकीय समितीकडे यायलाच हवी अशातला काही भाग नाही.”

करुण नायर आणि मुरली विजय यांनी व्यक्त केलेल्या मतांनंतर बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. याचसोबत निवड समितीचे प्रमुख एम. एस. के. प्रसाद यांनी आपले सहकारी देवांग गांधी यांनी करुण-मुरली विजय यांच्याशी संवाद साधला असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे क्रिकेट प्रशासकीय समितीने घेतलेल्या कठोर पवित्र्यानंतर हा वाद शमतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.