भारताने नुकतीच दक्षिण आफ्रिकेविरूद्धची कसोटी मालिका निर्विवाद वर्चस्व राखत जिंकली. टीम इंडियाने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आफ्रिकन संघाला पूर्णपणे नेस्तनाबूत करत ‘व्हाइटवॉश’ दिला. तिसऱ्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ४९७ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा पहिला डाव १६२ धावांवर तर फॉलो-ऑन नंतरचा डाव १३३ धावांवर आटोपला. त्यामुळे एक डाव आणि २०२ धावांनी विजय मिळवत भारताने मालिका ३-० ने जिंकली.

भारताने मालिकेत फलंदाजी, गोलंदाजी आणि फिल्डींग अशा तिन्ही आघाड्यांवर जोरदार कामगिरी केली. आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस यानेही भारताच्या क्षेत्ररक्षणाची स्तुती केली. या दरम्यान भारताचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनी भारतीय संघातील सर्वोत्तम फिल्डर कोण हे सांगितलं आहे. इतकेच नव्हे तर तो दशकातील सर्वोत्तम फिल्डर असल्याचेही श्रीधर यांनी म्हटले आहे.

“भारतीय संघाचा फिल्डींगचा स्तर दिवसेंदिवस सुधारताना दिसतो आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा हा दशकातील सर्वात भारी फिल्डर आहे. जाडेजा मैदानावर असतो तेव्हा संघातील खेळाडूंमध्ये एक वेगळीच उर्जा दिसून येते. तो प्रतिस्पर्धी संघाला एकही धाव सहजासहजी मिळवू देत नाही. प्रत्येक धावेसाठी प्रतिस्पर्धी फलंदाजांनी झगडावे लागते. त्याला उत्तम क्षेत्ररक्षणाची देणगीच मिळाली आहे. गेल्या दशकात भारतीय संघाला लाभलेला जाडेजा हा सर्वोत्तम फिल्डर होता”, असे श्रीधर यांनी सांगितले.

दरम्यान, भारत आणि बांगलादेश यांच्यात ३ ते १० नोव्हेंबरमध्ये तीन टी २० सामने होणार आहेत. तर १४ ते २६ नोव्हेंबरमध्ये २ कसोटी सामने होणार आहेत.