वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंडदरम्यान रंगणार आहे. हा सामना इंग्लंड येथील साउथॅम्पन मैदानात १८ ते २२ जून दरम्यान पार पडणार आहे. सध्या न्यूझीलंडचा संघ इंग्लंड दौऱ्यावर असून कसोटी मालिका सुरु आहे. तर टीम इंडियाही अंतिम सामना खेळण्यापूर्वी मैदानात घाम गाळत आहे. एका सराव सामन्यादरम्यान भारतीय खेळाडू लयीत असल्याचं दिसून आले. क्वारंटाइनचा अवधी पूर्ण केल्यानंतर एका सराव सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सराव सामन्यात यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत चांगल्या फॉर्मात दिसून आला. बीसीसीआयने सराव सामन्यादरम्यानचा व्हिडिओ शेअर केला आहे. या सामन्यात एका टीमचं कर्णधारपद विराट कोहलीकडे, तर दुसऱ्या टीमचं कर्णधारपद अजिंक्य रहाणे याच्याकडे होतं.

बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत पंतची धमाकेदार खेळी दिसून येत आहे. इतकंच नाही तर अर्धशतक त्याने षटकार ठोकत पूर्ण केलं. त्यानंतर त्याने बॅट उंचावर अभिवादन केलं. त्यामुळे पंतचा आक्रमकपणा अंतिम सामन्यात पाहायला मिळेल, असा अंदाज क्रीडाप्रेमी बांधत आहेत. पंतची ऑस्ट्रेलियातील कामगिरी इंग्लंडमध्ये कायम राहिली तर टीम इंडियाला विजय सोपा होईल. पंतने ऑस्ट्रेलियात खेळलेल्या दोन कसोटी सामन्यात महत्त्वपूर्ण खेळी केली होती.

कर्णधार विराट कोहली, शुभमन गिल, रोहीत शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे या व्हिडिओत फलंदाजी करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा आणि आर. अश्विन गोलंदाजी करताना दिसत आहेत. इशांत शर्मा, मोहम्मद शमी हे वेगवान गोलंदाज अजिंक्य रहाणेच्या संघात खेळत होते. तर शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा हे खेळाडू विराट कोहलीच्या संघात होते.

PSL: आंद्रे रसेलच्या डोक्याला चेंडू लागल्याने गंभीर दुखापत; रुग्णालयात केलं दाखल

दरम्यान, भारतीय संघ इंग्लंडमध्ये चार महिने असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका असणार आहे. ४ ऑगस्टपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे.