भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा याने इंग्लंडच्या विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी दीडशतकी खेळी केली. रोहितने २३१ चेंडूत फटकेबाज खेळी करत १६१ धावा केल्या. पहिल्या कसोटीत रोहितने केलेल्या अतिशय सुमार कामगिरीनंतर त्याच्यावर प्रचंड टीका झाली होती. काही चाहत्यांनी त्याला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्याचा सल्लाही कर्णधार विराट कोहलीला दिला होता. या साऱ्या टीकाकारांना रोहितने आपल्या बॅटने उत्तर दिलं.

IND vs ENG: मुंबईचा रोहित जगात भारी! ‘असा’ विक्रम करणारा पहिलाच क्रिकेटपटू

दमदार दीडशतकी खेळी करत रोहितने युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल याच्या एका विक्रमाशी बरोबरी साधली. रोहितने १८ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १६१ धावा केल्या. इंग्लंडविरूद्ध कसोटी, टी-२० आणि एकदिवसीय अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतक ठोकणारा रोहित शर्मा हा जगातील केवळ दुसरा फलंदाज ठरला. याआधी केवळ ख्रिस गेलने हा पराक्रम करून दाखवला होता. रोहितने चेन्नईच्या मैदानावर गेलच्या विक्रमाशी बरोबरी साधली.

Video: रोहितचा उत्तुंग षटकार; पत्नी रितिकाही झाली फिदा

रोहितने १३० चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं होतं. त्याचसोबत श्रीलंका, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या चारही संघांविरूद्ध सर्व फॉरमॅटमध्ये शतक ठोकणारा रोहित पहिलाच खेळाडू ठरला. रोहितने घरच्या मैदानावर ८४.७च्या सरासरीने धावा करत ऑस्ट्रेलियन दिग्गज सर डॉन ब्रॅडमन यांच्या पंगतीत स्थान मिळवलं. दीडशतकी खेळीनंतर झटपट धावा जमवताना फिरकीपटू जॅक लीचच्या गोलंदाजीवर स्वीप शॉट खेळून रोहित बाद झाला. मोईन अलीने सीमारेषेवर रोहितचा उत्तम झेल घेतला.