IPL स्पर्धेदरम्यान स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळलेला क्रिकेटपटू श्रीसंतला अखेर BCCI कडून दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने श्रीसंतची बाजू ऐकून घेऊन त्यावर ३ महिन्याच्या आत पुनर्विचार करण्याचे आदेश BCCI ला १५ मार्च २०१९ रोजी दिले होते. त्यानंतर लोकपाल डी. के. जैन हे श्रीसंतबद्दल निर्णय घेतील असा निर्णय BCCI ने घेतला होता. त्यानुसार आज अखेर त्याच्यावरील आजीवन बंदी हटवण्यात आली असून त्याला २०२० मध्ये क्रिकेटच्या मैदानावर परतता येणार आहे.

IPL स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळल्यानंतर श्रीसंतवर BCCI ने आजीवन बंदी घातली होती. मात्र या आजीवन बंदीच्या शिक्षेबाबत BCCI ने पुनर्विचार करावा आणि ३ महिन्यांच्या आत याबाबतचा निकाल द्यावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर BCCI मध्ये लोकपाल म्हणून डी. के. जैन यांची नियुक्ती झाली आणि हे प्रकरण त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. याबाबत निर्णय देताना लोकपाल म्हणाले की श्रीसंतने आपल्या उमेदीच्या काळातील बराचसा काळ मैदानाबाहेर घालवला असून जवळपास ६ वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगली आहे. त्यामुळे त्याच्यावरील आजीवन बंदी उठवून त्याला ७ वर्षांच्या बंदीची शिक्षा देण्यात आली आहे. त्याच्या या बंदीचा कालावधी सप्टेंबर २०२० मध्ये पूर्ण होईल. त्यानंतर तो क्रिकेटच्या मैदानावर परतू शकतो.

काय होते प्रकरण ?

श्रीसंतला २०१३ मध्ये IPL स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून दिल्ली पोलिसांनी मुंबईतून अटक केली होती. त्यानंतर BCCI ने श्रीसंतवर आजीवन बंदी घालण्याचा आणि १० लाख रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला होता, मात्र आजीवन बंदी घालण्याचा निर्णय अयोग्य असल्याचे श्रीसंतने म्हटले होते. त्यानंतर २०१९ मध्ये आपण पोलिसांच्या भीतीने आपण हा गुन्हा कबूल केल्याचा दावा श्रीसंतने केला होता. सर्वोच्च न्यायालयात श्रीसंतने दिल्ली पोलिसांनी आपल्या कुटुंबाला गोवण्याची तसेच छळ करण्याची धमकी दिल्यानेच आपण स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचा गुन्हा कबूल केला असल्याचे सांगितले होते.

सर्वोच्च न्यायालयाने स्पॉट फिक्सिंगच्या काळात श्रीसंतची वर्तवणूक योग्य नव्हती, असा ठपका ठेवला होता. तर आपल्यावर BCCI कडून लावण्यात आलेली बंदी अत्यंत कठोर असून आपण बेकायदेशीर गोष्टींमध्ये सहभागी होतो हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा नव्हता, असे श्रीसंतकडून न्यायाधीश अशोक भूषण आणि के एम जोसेफ यांच्या खंडपीठासमोर सांगण्यात आले होते. कोणत्याही क्रिकेटपटूला इतकी कठोर शिक्षा झाली नसल्याचे सांगत माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचे उदाहरणही श्रीसंतने दिले होते. मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळलेल्या मोहम्मद अझरुद्दीनला क्रिकेट प्रशासनावर पुन्हा येण्याची तसेच हैद्राबाद क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची BCCI कडून परवानगी देण्यात आली होती, अशी माहिती त्याचे वकील सलमान खुर्शिद यांनी खंडपीठाला दिली होती. त्यामुळे जर अझरुद्दीनला पुन्हा संधी मिळू शकते तर श्रीसंतला का नाही? असा सवाल श्रीसंतच्या वकिलांनी उपस्थित केला होता. त्यानंतर अखेर श्रीसंतला हा दिलासा देण्यात आला.