भारताचा स्टार फिरकीपटू प्रग्यान ओझा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले. प्रग्यानने शुक्रवारी तत्काल प्रभावाने व्यावसायिक क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमधून निवृत्ती स्वीकारली. प्रग्यान ओझाने २००८ साली क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर १६ वर्षे त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. २०१३ साली त्याने भारतीय संघाकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला, पण त्यानंतर मात्र तो देशांतर्गत क्रिकेटपुरताच मर्यादित राहिला. २०१९ पर्यंत त्याने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत आपले नशीब आजमावले, पण अखेर आज त्याने क्रिकेटला रामराम ठोकला.

प्रग्यान ओझा

विशेष म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा निरोपाचा सामना हाच प्रग्यान ओझा याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. सचिनने १३ नोव्हेंबर २०१३ ला निरोपाचा सामना वेस्ट इंडीजविरूद्ध खेळला. त्या सामन्यात प्रग्यान ओझा भारतीय संघाचा भाग होता. पण दुर्दैवाने पुढे त्याला टीम इंडियात संधी मिळाली नाही. प्रग्यानने २००९ ते २०१३ या काळात २४ कसोटी सामन्यांमध्ये ११३ गडी बाद केले.