|| प्रशांत केणी
भारतीय क्रिकेट संघाला मायदेशात हमखास कसोटी जिंकून देणाऱ्या फिरकी परंपरेचा वारसदार म्हणजे ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन. एवढय़ापुरतीच त्याची ओळख मर्यादित राहात नाही. यापेक्षा भारताचा अष्टपैलू खेळाडू म्हणणे त्याच्यासाठी अधिक योग्य ठरते. कारण संघ अडचणीत असताना झुंजार फलंदाजी करण्याची क्षमता त्याच्यात आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या गोलंदाजीच्या माऱ्यासमोर त्याने पुन्हा एकदा ते सिद्ध केले आहे. याचप्रमाणे त्याच्या खात्यावर पाच शतके आणि ११ अर्धशतकांसह २८.२३ अशी धावसरासरीही जमा आहे.
भारतात फिरकीला अनुकूल खेळपट्टय़ांवर बळींची संख्या वेगाने वाढवता येते, परंतु परदेशात या फिरकीपटूंचा काय उपयोग? ही हेटाळणी अश्विनच्याही वाटय़ाला आली. पण अश्विनच्या आकडेवारीतून मात्र हे सिद्ध होत नाही. कारण त्याने मायदेशातील ४५ कसोटींमध्ये २७१ बळी मिळवले आहेत, तर परदेशांतील ३१ सामन्यांत १२३ बळी मिळवले आहेत. याशिवाय त्याची फलंदाजीही भारताला तारते. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेटपटूंच्या विभागणीत अश्विन कसोटी क्रिकेट संघाचा अविभाज्य भाग ठरतो.
अश्विन हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या राजकारणातील धूर्त आणि वादग्रस्त प्रशासक एन. श्रीनिवासन यांच्या तामिळनाडू राज्यातला. त्यांच्याच मालकीच्या चेन्नई सुपर किंग्जमधून अश्विनने अनेक वर्षे गाजवली. एके काळी अश्विन हा भारतीय संघ आणि चेन्नई संघातला महेंद्रसिंग धोनीचा सर्वात विश्वासार्ह खेळाडू होता. पण धोनीच्या निवृत्तीनंतरही अश्विन टिकला, नव्हे अधिक तेजाने तळपला.
बालपणी शालेय आणि वयोगटांच्या क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजी आणि सलामीवीर ही अश्विनची बलस्थाने होती. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॅक कॅलिसप्रमाणे अष्टपैलू खेळाडू होण्याचे स्वप्न त्याने जोपासले होते. ११व्या वर्षी स्पोर्ट्स्टार करंडक क्रिकेट स्पर्धेत त्याने शतकही नोंदवले होते. परंतु १४-१५ वर्षांचा असताना त्याला गंभीर दुखापत झाली आणि सहा महिने सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. त्यातून सावरल्यावर तो पुन्हा मैदानावर परतण्याच्या बेतात होता. परंतु वेगवान गोलंदाजी करू नये, हा वैद्यकीय सल्ला त्याच्या घडू पाहणाऱ्या कारकीर्दीच्या आड येत होता. त्यामुळे आई चित्राने त्याला फिरकी गोलंदाजी टाकण्याचा सल्ला दिला. दरम्यान अश्विनचे संघातले स्थानसुद्धा रिक्त राहिले नव्हते. पण फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुन्हा भरारी घेत त्याने संघात स्थान मिळवले आणि कालांतराने भारतीय क्रिकेटला एक चांगला खेळाडू मिळाला.
चेन्नईच्या पश्चिमेकडे माबल्लममधील रामकृष्णापुरम् भागात अश्विनचे निवासस्थान आहे. अश्विनची आई चित्रा निप्पॉन पेंटस् कंपनीत मानव संसाधन व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे, तर वडील रविचंद्रन हे रेल्वेत अधिकारी. आपल्या एकुलत्या एक मुलावर त्यांचे निस्सीम प्रेम. त्यामुळेच ‘मम्माज बॉय’ म्हणून लोकप्रिय असलेल्या अश्विनचे एकंदर आयुष्य हे लाडाकोडातच गेले. अश्विन पाच वर्षांचा होता, तेव्हापासून त्याला क्रिकेटचा लळा लागला. वडीलसुद्धा क्लब क्रिकेट खेळत असल्यामुळे त्यांनी अश्विनला सुरुवातीपासूनच धडे द्यायला सुरुवात केली. मग नऊ वर्षांचा झाल्यावर त्याला क्रिकेटच्या तंत्रशुद्ध प्रशिक्षणासाठी दाखल केले. प्रशिक्षक विजय कुमार यांनी अश्विनला ऑफ-स्पिन गोलंदाजीचे धडे दिले. त्यानंतर सुनील सुब्रमण्यम् आणि डब्ल्यू. व्ही. रामन यांनी त्याच्या गोलंदाजीला पैलू पाडले.
अश्विनच्या गोलंदाजीच्या खुणा बालपणीपासूनच या कुटुंबीयांच्या टुमदार बंगल्याच्या भिंतींवर उमटायच्या. भिंतीवरील चेंडूंच्या निशाणांमुळे अनेक पाहुण्यांना आश्चर्य वाटायचे की, आई रंग तयार करणाऱ्या निप्पॉन कंपनीत उच्च पदावर असतानाही घरातील रंग खचलेले कसे? सुरुवातीला वारंवार रंग काढूनही अश्विन ते बिघडवायचा. पण नंतर मुलाचे कर्तृत्व मी अभिमानाने दाखवू लागले, असे चित्रा यांनी सांगितले. ५ जून २०१०ला अश्विनने श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय पदार्पण केले, तर नोव्हेंबर २०११मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने कसोटी पदार्पण केले. तेव्हापासून हा क्रिकेटाध्याय यशस्वीपणे सुरू आहे. २०११मध्ये त्याने बालमैत्रीण प्रीती नारायणनशी विवाह केला. त्यांना अखिरा आणि आध्या अशा दोन मुली आहेत. अन्य क्रिकेटपटूंच्या पत्नींप्रमाणे प्रीतीही समाजमाध्यमावर कार्यरत असते.
येत्या जूनमध्ये अश्विनची कारकीर्द एक तप पूर्ण करील. कसोटी क्रिकेटमध्ये वेगाने बळींचे टप्पे ओलांडणाऱ्या अश्विनला चारशे बळींचा टप्पा साद घालत आहे. आता तो ३४ वर्षांचा झाला असल्याने त्याची क्रिकेट कारकीर्द अस्ताकडे वाटचाल करीत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळेच चेपॉकवर इंग्लंडविरुद्धचे त्याचे शतक आणि पाच बळी त्याच्यासाठी भावनिक ठरले. घरच्या मैदानावर हा त्याचा अखेरचा सामना ठरू शकतो, याची जाणीव क्रिकेटचाहत्यांनाही होती.
prashant.keni@expressindia.com
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 21, 2021 12:28 am