ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड गुरुवारी करण्यात येणार आहे. संदीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय निवड समितीची गुरुवारी एक वाजता बैठक होणार असून यामध्ये विश्वचषकाचा संभाव्य संघ निवडण्यात येईल, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव संजय पटेल यांनी दिली.
२०११ चा विश्वचषक भारताने जिंकला होता आणि या विश्वविजयामध्ये मोलाचा वाटा असणारा जवळपास पूर्ण संघ या वेळी संभाव्य यादीतही पाहायला मिळणार नसल्याचे म्हटले जात आहे. भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने निवृत्ती घेतली आहे. सलामीवीर वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, हरभजन सिंग, युवराज सिंग, आशीष नेहरा हे खेळाडू सध्या फॉर्मात नाहीत. तर अनुभवी वेगवान गोलंदाज झहीर खान दुखापतीनंतर खेळलेला नाही.
सध्याच्या घडीला चांगली कामगिरी करीत काही खेळाडूंनी संभाव्य संघात आपली जागा निश्चित केल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये अक्षर पटेलचे नाव प्रामुख्याने घेतले जात आहे, त्याचबरोबर अंबाती रायुडू आणि मनोज तिवारी यांच्या नावाचाही समावेश आहे. तर महेंद्रसिंग धोनीसहित विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार यांची नावे निश्चित समजली जात आहेत.