विश्वचषक स्पर्धा २०१९ मध्ये पाकिस्तानच्या संघाला सुमार कामगिरीचा फटका बसला. त्यामुळे साखळी फेरीतच त्यांना गाशा गुंडाळावा लागला. त्यानंतर श्रीलंकेसोबत तब्बल १० वर्षांनी पाकिस्तानात खेळताना यजमानांनी २-० ने एकदिवसीय मालिका जिंकली, पण टी २० मालिकेत मात्र पाकिस्तानला ३-० असा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंवर टीका केली जात आहे. पण या दरम्यान विराटने जिंकण्याची जिद्द पाकिस्तानकडून शिकली आहे, असा अजब दावा पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब अख्तर याने केला आहे.

सौरव गांगुलीच्या BCCI अध्यक्षपदाबाबत शरद पवार म्हणतात…

“विराट कोहलीने जिंकण्याची जिद्द पाकिस्तानकडून घेतली. ९० च्या दशकात आम्ही खेळाचा आनंद घेत भारताला भारतातच पराभूत केले होते. तसाच खेळ आणि जिद्द विराटमध्ये दिसते आहे. सध्या भारत हा पाकिस्तानसारखा खेळत आहे आणि पाकिस्तानची अवस्था काही वर्षांपूर्वीच्या भारतीय क्रिकेट संघासारखी झाली आहे. पाकिस्तानची ही अवस्था अत्यंत विदारक आहे. आम्हाला भित्रे क्रिकेटपटू नको आहेत. मैदानावर सत्ता गाजवणारे निर्भिड खेळाडू हवे आहेत”, असे शोएबने म्हटले आहे.

क्रिकेट World Cup दर ३ वर्षांनी? BCCI-ICC मध्ये वादाची ठिणगी

भारतीय क्रिकेट संघाने आफ्रिकेविरूद्ध कसोटी मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर अख्तरने कोहलीचे कौतुकदेखील केले. “२०१९ ची विश्वचषक स्पर्धा पार पडली, तेव्हाच मी म्हटले होते की येत्या काळात विराट कोहली हा एक उत्तम कर्णधार म्हणून नावारूपास येईल. कारण तो त्याच्या चूकांतून बोध घेतो आणि आवश्यक सुधारणा करतो. सध्या सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट मालिकेत त्याने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला डोके वर काढू दिले नाही. फलंदाजीचा क्रम कसा असावा हे त्याला ठाऊक आहे. निर्भिडपणे संघाचे नेतृत्व करणे हा त्याचा गुण मला अधिक आवडतो. म्हणूनच सध्या कोहली हा जगातील सर्वोत्तम कर्णधार आहे. इतर संघांचे कर्णधार हे त्याच्या आसपासदेखील नाही”, अशा शब्दात अख्तरने विराट कोहलीचे कौतुक केले होते.