भारत आणि विंडिज यांच्यात २२ ऑगस्टपासून कसोटी मालिका सुरू होणार आहे. ही मालिका टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेअंतर्गत खेळण्यात येणार आहे. २ सामन्यांची ही मालिका असून टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत गुणांचे खाते उघडण्यासाठी दोनही संघ दमदार तयारी करत आहेत. तशातच भारताचा कर्णधार विराट कोहली याला मात्र एक गोष्टीचं ‘टेन्शन’ सतावत आहे.

सध्याचे फलंदाज कसोटी क्रिकेटमध्ये आपले सर्वस्व पणाला लावून खेळतात हे मला मान्य आहे. आम्ही गेल्या वर्षभरात खूप प्रवास केला. त्यात आम्ही इंग्लंडकडून पराभूत झालो. तेव्हा फलंदाजांनी अपेक्षाभंग केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियात मात्र आम्ही इतिहास रचला. आमच्या फलंदाजांनी केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर आम्ही त्यांना त्यांच्याच भूमीवर पराभूत केले. स्वत:च्या फलंदाजीपुरते बोलायचे झाले, तर संघातील जबाबदारीनुसार खेळ करणे आवश्यक आहे. पण या टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये फलंदाजी करणे इतके सोपे नसेल, अशी चिंता विराटने बोलून दाखवली.

“टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेअंतर्गत खेळताना प्रत्येक सामना हा खूप महत्वाचा आणि आव्हानात्मक असेल. कसोटी सामना खेळण्याचा उद्देशदेखील बदलेल. टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा हे ICC ने उचललेले एक अत्यंत चांगले पाऊल आहे. अशा स्पर्धेची गरज होतीच. कसोटी क्रिकेटचा हळूहळू अस्त होत चालला आहे असे म्हटले जात आहे. पण या स्पर्धेमुळे कसोटीला पुन्हा एकदा महत्व प्राप्त होईल. कसोटी क्रिकेट खेळताना आता पुन्हा एकदा खेळाडू सामना जिंकण्याच्या दृष्टीने खेळतील. टेस्ट चॅम्पियनशिपचा हाच खरा उद्देश आहे”, असेही विराट म्हणाला.

भारत-विंडिज पहिला सामना २२ ते २६ ऑगस्ट तर दुसरा सामना ३० ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान होणार आहे.