भारतीय पुरुष संघापाठोपाठ मिताली राजच्या महिला संघानेही न्यूझीलंडमध्ये वन-डे मालिकेत विजयी आघाडी घेतली. दुसऱ्या वन-डे सामन्यात भारतीय महिलांनी न्यूझीलंडवर ८ गडी राखून मात केली. ३ सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला सध्या २-० ने आघाडीवर आहे. न्यूझीलंडने दिलेले १६२ धावांचं आव्हान भारतीय महिलांनी स्मृती मंधाना आणि कर्णधार मिताली राजच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पूर्ण केले. स्मृतीने सामन्यात नाबाद ९० तर मिताली राजने नाबाद ६३ धावांची खेळी केली.

या सामन्यात भारताची अष्टपैलू खेळाडू २१ वर्षीय दीप्ती शर्मा हिनेदेखील एक महत्वाची भूमिका बजावली. दीप्ती शर्माने दुसऱ्या सामन्यात ५१ धावात २ गडी टिपले आणि निर्णायक ८ धावा केल्या. या कामगिरीच्या जोरावर तिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १ हजार धावा आणि ५० बळी घेण्याचा विक्रम केला आहे. ही कामगिरी तिने ४३ सामन्यात केली आणि कपिल देव यांचा विक्रम मोडला. कपिल यांनी हीच कामगिरी ४६ सामन्यात केली होती. दिप्तीने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातही २७ धावात २ गडी बाद केले होते.

सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या महिलांनी पहिल्या सामन्याच्या तुलनेत भारतीय महिलांचा नेटाने सामना केला. कर्णधार सॅटरवेटने ८७ चेंडूत ७१ धावांची खेळी करुन संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाढून दिली. मात्र न्यूझीलंडच्या इतर फलंदाजांना आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. भारताकडून अनुभवी झुलन गोस्वामीने ३, एकता बिश्त-दिप्ती शर्मा आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी २-२ तर शिखा पांडेने १ बळी घेतला.

आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्ज भोपळाही न फोडता माघारी परतली. यानंतर दिप्ती शर्माही अवघ्या 8 धावा काढून माघारी परतली. यानंतर मात्र स्मृती मंधानाने कर्णधार मिताली राजसोबत जोडी जमवत तिसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचली. या जोडीपुढे न्यूझीलंडच्या गोलंदाज अक्षरशः हतबल दिसल्या. स्मृती मंधानाला तिच्या अर्धशतकी खेळीसाठी सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.