ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱया आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड थोड्याच वेळात होईल. मागील विश्वचषकाचे जेतेपद आपल्याकडे असले तरी गेल्या चार वर्षांत भारतीय संघाचा चेहरामोहरा बदलला आहे. त्यामुळे मागील विश्वविजयामध्ये मोलाचा वाटा असणारा पूर्ण संघ या वेळी संभाव्य यादीत पाहायला मिळण्याची शक्यता फार कमीच आहे.

फलंदाजी-
वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, युवराज सिंग हे खेळाडू सध्या फॉर्मात नाहीत. तर सध्याच्या घडीला चांगली कामगिरी करीत अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिखर धवन, रोहीत शर्मा या खेळाडूंनी आपली दावेदारी सिद्ध करुन दाखवली आहे. दुसऱयाबाजूला कर्णधार धोनीसह विराट कोहली, सुरेश रैना, रवींद्र जडेजा यांची नावे निश्चित समजली जात आहेत. रॉबीन उथप्पा, युसूफ पठाण देखील संधीच्या प्रतिक्षेत आहेत. मग, निव्वळ अनुभव आणि ज्येष्ठतेचा विचार करता युवराज आणि गौतमचा संभाव्य संघात समावेश करावा का? हा प्रश्न उपस्थित होतो. कारण, ऑस्ट्रेलियातील वेगवान आणि उसळी खेळपट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर तोडीसतोड अनुभवी खेळाडू संघात असावेत याला बीसीसीआयची निवड समिती प्राधान्य देईल का? हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरेल. विशेष म्हणजे, सचिनची निवृत्ती आणि २०११ च्या विश्वचषकात सर्वोत्कृष्ट कामगिरीचा किताब पटकाविणाऱया युवराजची यंदाच्या विश्वचषकात निवड होणार का? असा प्रश्नच निर्माण व्हावा यातच भारतीय संघाच्या फलंदाजीचा चेहरा आता बदलला असल्याचे स्पष्ट होऊन जाते.

गोलंदाजी-
मागील विश्वचषकात भारतीय संघाच्या गोलंदाजीचे नेतृत्त्व सांभाळलेला वेगवान गोलंदाज झहीर खान गेल्या चार वर्षांत चर्चेत देखील नाही. दुखापतीनंतर तो खेळलेलाच नाही. त्याची जागी गेल्या चार वर्षांत भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद शमी, ईशांत शर्मा संघाच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व सांभाळत आहेत. पण, झहीर सारखा एक खांबी आणि विश्वासार्ह चेहरा सध्या दिसून येत नाही. त्यामुळे यंदा संघाच्या वेगवान गोलंदाजीची धुरा कोण सांभाळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. भुवनेश्वर, उमेश यादव, ईशांत आणि शमी यांच्याकडे कल असला तरी अशोक दिंडा, वरुण अॅरोन हे देखील पर्याय उपलब्ध आहेत. मागील विश्वचषकात भारताच्या फिरकी गोलंदाजीचा बुरूज सांभाळलेल्या हरभजन सिंगला गेल्या चार वर्षांत भारतीय संघात स्थान मिळालेले नाही. पियुष चावलाचीही तिच स्थिती आहे. आर.अश्विन आणि रविंद्र जडेजाचे स्थान निश्चित मानले जात असून अक्षर पटेलला यावेळी संधी मिळण्याची शक्यता आहे.

अष्टपैलू-
युवराज सिंगने मागील विश्वचषकात अष्टपैलू क्रिकेटपटूची व्याख्या आपल्या खेळीने सहजसोपी करून दाखवली होती. युवराजने अष्टपैलू क्रिकेटपटूच्या संघातील महत्त्वाला एक नवी उंची गाठून दिली. गेल्या चार वर्षांत ही जबाबदारी रविंद्र जडेजा आणि सुरेश रैना दोघे आळीपाळीने पार पाडत आहेत. त्यामुळे या दोघांची निवड निश्चित असेल. त्यात आता अंबाती रायुडूनेही आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवले आहे. तर नमन ओझा, परवेझ रसूल, युसूफ पठाण देखील रांगेत आहेत.