भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वाखालील सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवणारा भारतीय वेगवान गोलंदाज सुदीप त्यागी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. सुदीपने मंगळवारी (१७ नोव्हेंबर) क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती स्वीकारली. ३३ वर्षीय सुदीपने ४ एकदिवसीय आणि एका टी२० सामन्यात टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले. आपल्या पदापर्णाच्या मालिकेत त्याने श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज कुमार संगाकारा याचा बळी टिपत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरूवात केली.

२००९ साली धोनीच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेविरुद्ध सुदीपने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पहिल्या टी२० सामन्यात त्यागीला कोणतेही यश मिळाले नाही. पण एकदिवसीय सामन्यात मात्र त्याने श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज कुमार संगाकारा याला माघारी धाडलं. असं असलं तरी त्याची कारकिर्द फारशी मोठी ठरली नाही. २०१० मध्ये त्याने भारतीय संघाकडून अखेरचा सामना खेळला. त्यानंतर त्याला भारतीय संघाकडून संधी मिळाली नाही. IPL 2009 आणि 2010 या दोन हंगामात तो चेन्नई सुपर किंग्सकडून १४ सामने खेळला होता. परंतु त्यातही त्याला केवळ ६ गडी बाद करता आले. सुदीपने निवृत्तीची घोषणा करताना लिहिले, “माझ्या स्वप्नांना निरोप देणे हा माझ्यासाठी आतापर्यंतचा सर्वात अवघड निर्णय आहे!”

सुदीपने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४१ सामने खेळत १०९ बळी घेतले. तर 23 अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये ३१ बळी टिपले. “आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. मी हे स्वप्न पूर्ण केले. भारताचा ध्वज असलेली जर्सी अंगावर घालणे, हे एक स्वप्न होते आणि ते स्वप्न मी पूर्ण करू शकलो याचा मला अभिमान आहे”, अशी भावना त्याने व्यक्त केल्या.