पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थिरस्थावर होण्यासाठी संघ व्यवस्थापन युवा खेळाडूंना अधिक संधी देईल, अशी आशा भारताचा सलामीवीर शिखर धवन याने व्यक्त केली आहे.

युवा खेळाडूंना मिळणाऱ्या चार ते पाच संधीमध्ये त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध करावे, असे कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट केले होते. त्यावर धवनने ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘‘युवा खेळाडू संघात आल्यानंतर व्यक्त होण्यासाठी कचरतात. त्यामुळे त्यांना अधिक संधी देण्याची गरज आहे. युवा खेळाडू या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळेच त्यांना अधिकाधिक संधी देण्यात यावी. श्रेयस अय्यर किंवा ऋषभ पंत यांसारख्या खेळाडूंना मदत करण्यासाठी संघातील अनुभवी खेळाडू नेहमीच पुढे असतात,’’ असे धवनने सांगितले.

‘‘युवा खेळाडूंना आमच्याशी कोणत्याही बाबतीत संवाद साधण्याची इच्छा असेल तर आम्ही त्यांना मदत करण्यासाठी तयार आहोत. काही वेळेला श्रेयस किंवा ऋषभ आमच्याकडे येऊन फलंदाजीविषयी चर्चा करतात, तेव्हा त्यांच्यातील नैराश्य दूर घालवण्याचा आमचा प्रयत्न असतो. विराट किंवा रोहित शर्मासह मी फलंदाजी करत असतो, त्या वेळीही आमच्यात संवाद सुरू असतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संवाद हा महत्त्वाचा धागा असतो,’’ असेही धवनने सांगितले.