जागतिक महिला दिवशी इतिहास घडवण्याची संधी हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघाने दवडली. महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत यजमान ऑस्ट्रेलियाने भारतावर ८५ धावांनी दणदणीत विजय मिळवत आपलं पाचवं जेतेपद पटकावलं. साखळी फेरीत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला अंतिम सामन्यात सपशेल अपयशी ठरल्या. संपूर्ण स्पर्धेत स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर, जेमायमा रॉड्रीग्ज या फलंदाजांचं अपयश उठून दिसलं. अंतिम फेरीतल्या पराभवानंतर सलामीवीर स्मृती मंधानाने आम्हाला आत्मपरिक्षणाची गरज असल्याचं म्हटलं आहे.

“आमच्यासाठी ही आत्मपरिक्षणाची वेळ आहे. यशापेक्षा अपयश तुम्हाला अनेक गोष्टी शिकवतं. आम्हाला थोडा वेळ एकटं सोडा, आगामी वर्षांमध्ये अधिक चांगली कामगिरी कशी करता येईल याबद्दल आम्हाला विचार करण्याची गरज आहे. टी-२० क्रिकेट हा प्रकार आमच्यासाठी सोपा नव्हता. मात्र आम्ही आता रुळलो आहोत. प्रशिक्षकांनी यासाठी आम्हाला भरपूर मदत केली. संघातील काही तरुण खेळाडूंनी धडाकेबाज खेळ करत संघाला एक वेगळी दिशा मिळवून दिली आहे. अंतिम सामन्यात आम्ही अपयशी ठरलो, पण एक संघ म्हणून आम्ही अधिक प्रगल्भ झालो आहोत हे मी सांगू शकते”, सामना संपल्यानंतर स्मृती मंधानाने आपली प्रतिक्रीया दिली.

संपूर्ण स्पर्धेत स्मृती मंधानाला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. अंतिम सामन्यात विजयासाठी १८५ धावांचं आव्हान दिल्यानंतर भारतीय महिला दडपणाखाली गेला. त्यातच संपूर्ण स्पर्धेत फॉर्मात असलेली शफाली वर्मा पहिल्याच षटकात बाद झाल्यामुळे भारताला धक्का बसला. या धक्क्यामधून भारतीय संघ कधीही सावरुच शकला नाही. स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर, जेमायमा रॉड्रीग्ज या फलंदाजही स्वस्तात माघारी परतल्या.

अवश्य वाचा – BLOG : पराभवाला गोंजारणं थांबवा !