भारतामध्ये क्रिकेटपटू आणि क्रिकेट यांच्यासाठी पोषक वातावरण आहे, पण पाकिस्तानात मात्र अवस्था चांगली नाही. पण तरीही मोठय़ा जिद्दीने पाकिस्तानचा संघ उभा राहतो आणि जिंकतो. भारतीय क्रिकेटपटू आयपीएलमुळे मालामाल झाले आहेत, पण क्रिकेटपटू मालामाल झाल्याने संघ सक्षम होत नाही, असे पाकिस्तानचे माजी वेगवान गोलंदाज आणि ‘रिव्हर्स स्विंग’चे अनभिषिक्त सम्राट समजले जाणारे वकार युनूस बोलत होते.
तिसरा एकदिवसीय सामना पाहण्यासाठी वकार भारतात आला होता. सामन्यापूर्वी त्यांनी सईद अन्वर आणि इंझमाम-उल-हक या माजी सहकाऱ्यांसह ग्रेटर नॉएडा येथील ‘द बुद्ध इंटरनॅशनल सर्किट’लाही भेट दिली.
आयपीएलमुळे युवा खेळाडूंना कोटय़वधी रुपये मिळतात आणि एवढय़ा कमी वयात एवढी जास्त रक्कम मिळाल्यानंतर बऱ्याचदा तो खेळाडू दिशाहीन होतो. त्याची देशासाठी चांगली कामगिरी करण्याची भूक संपते. गेल्या सहा वर्षांपासून आयपीएल सुरू आहे, पण या आयपीएलमधून देशाला सावरेल, असा एकही खेळाडू दिलेला नाही. आयपीएलचा भारतीय संघाला फायदा नाही तर नुकसानच झाले आहे. आयपीएलमुळे दुखापती बळावल्या, त्याचा फटका बऱ्याचदा भारतीय संघाला बसला. त्याचबरोबर आयपीएलमुळे क्रिकेटपटूंना आता खेळापेक्षा पैसा महत्त्वाचा वाटू लागला आहे आणि त्यामुळे भारतीय संघाची अवस्था चांगली नाही, असे वकार बोलत होते.
भारतीय संघाबद्दल वकार म्हणाले की, भारतीय संघाची एवढी वाईट कामगिरी यापूर्वी पाहिली नव्हती. कारण भारतात त्यांच्याच मातीत पराभूत करणे नक्कीच सोपे नाही. भारतीय संघ पराभूत व्हायचा, पण एवढय़ा वाईट पद्धतीने नाही. फलंदाजी हे भारताचे बलस्थान आहे. पण या मालिकेत महेंद्रसिंग धोनीचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. तिन्ही सामन्यांमध्ये त्यानेच संघातर्फे सर्वाधिक धावा केल्या. निवड समितीने या साऱ्या गोष्टींचा विचार करायला हवा. चांगला संघ बनवण्यासाठी काही मोठे बदलही करावे लागतात, निवड समितीने यापुढे कडक पावले उचलली तर नक्कीच भारतीय संघाला पुन्हा चांगले दिवस येतील.
पाकिस्तान संघाची मात्र त्यांनी भरभरून स्तुती केली. ते म्हणाले, ‘‘पाकिस्तानच्या संघाचे कौतुक करावे तेवढे फार थोडे आहे. गोलंदाजी ही नेहमीच पाकिस्तानचे बलस्थान आहे आणि ती परंपरा या युवा खेळाडूंनी कायम ठेवली आहे. इरफान आणि जुनैद खान या दोन्ही युवा गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरीचा नमुना पेश केला. कामगिरीत सातत्य राखल्यास हे दोघे पाकिस्तानचे भविष्य उज्ज्वल करतील. सईद अजमल हा अफलातून गोलंदाज आहे, तो नेहमीच संघाच्या कामी येतो. फलंदाजीमध्ये नासिर जमशेदसारखा चांगला युवा फलंदाज आम्हाला मिळाला आहे. पाकिस्तानने कामगिरीत सातत्य राखले तर नक्कीच आम्ही अव्वल क्रमांकावर पोहोचू.’’