इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) स्थलांतर झाल्यामुळे किमान ५० नेटमधील गोलंदाजांना संयुक्त अरब अमिरातीमध्ये जाण्याची संधी मिळणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स या संघांनी प्रत्येकी १० उदयोन्मुख नेट गोलंदाजांचा विशेष ताफा सोबत घेतला आहे. दिल्ली कॅपिटल्स संघानेही सहा नेट गोलंदाजांची नियुक्ती केली आहे.

नेट गोलंदाजांमध्ये प्रथमश्रेणी तसेच १९ आणि २३ वर्षांखालील वयोगटांच्या क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या युवकांचा समावेश आहे. या गोलंदाजांना महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना आणि ऋषभ पंत यांच्यासारख्या मातबर फलंदाजांचा सामना करण्याची संधी या निमित्ताने मिळेल.

आतापर्यंत ‘आयपीएल’ ज्या शहरात असेल, तेथील स्थानिक उदयोन्मुख गोलंदाजांना नेटमधील सरावासाठी पाचारण केले जायचे. परंतु अमिरातीमधील जैव-सुरक्षा नियमावलीमुळे संघांवरील बंधने वाढली आहेत. त्यामुळे प्रत्येक संघांना सराव सत्रांसाठी गोलंदाजांची व्यवस्था स्वत:च करावी लागणार आहे.

‘‘अमिरातीमधील सरावासाठी आम्ही जवळपास १० गोलंदाजांचा ताफा बाळगणार आहोत. ते संपूर्ण स्पर्धेच्या कालावधीत संघासोबतच असतील,’’ अशी माहिती चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी दिली.

फिरकी गोलंदाजांना प्राधान्य

अमिरातीमधील खेळपट्टय़ांनुसार सर्वच संघ नेटमधील गोलंदाज निवडताना फिरकी गोलंदाजांना प्राधान्य देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वेगवान गोलंदाजांच्या तुलनेत डावखुरे फिरकी गोलंदाज किंवा मनगटी फिरकी गोलंदाज यांची संख्या अधिक असेल, असे विश्वसनीय सूत्रांनी संकेत दिले आहेत.

अमिरातीकडे स्पर्धेचे अधिकृत पत्र

दुबई : ‘आयपीएल’चे १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत आयोजन करण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अधिकृत पत्र अमिराती क्रिकेट मंडळाला मंगळवारी प्राप्त झाले आहे. अमिरातीत स्पर्धेचे स्थलांतरण करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी मिळाल्याचे सोमवारी ‘आयपीएल’चे प्रमुख ब्रिजेश पटेल यांनी जाहीर केले होते.