आयपीएल खेळाडू निवड प्रक्रियेत रैना, जडेजा राजकोटच्या संघात
भारताचा मर्यादित षटकांचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि धडाकेबाज फलंदाज सुरेश रैना यांना इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) खेळाडू निवड प्रक्रियेत सर्वाधिक १२.५ कोटी रुपये भाव मिळाला. मात्र चेन्नई सुपर किंग्जच्या या दोन महत्त्वाच्या शिलेदारांची फाटाफूट झाली आहे. धोनीला संजीव गोएंका यांच्या मालकीच्या पुणे संघाने खरेदी केले आहे, तर इंटेक्स मोबाइल कंपनीच्या मालकीच्या राजकोट संघाने सुरेश रैनाला खरेदी केले.
आयपीएल स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणामुळे चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांवर दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. दोन्ही निलंबित संघांचे ५० खेळाडू निवड प्रक्रियेसाठी उपलब्ध होते. चेन्नईच्या सात आणि राजस्थानच्या तीन अशा एकूण दहा खेळाडूंचे या निवड प्रक्रियेत संघ निश्चित झाले. धोनी आणि रैनाला अनुक्रमे पुणे आणि राजकोटने ‘प्रथम पसंती’ दिली. त्यानंतर भारताचा फॉर्मात असलेला फलंदाज अजिंक्य रहाणे आणि अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा यांना ९.५ कोटी रुपयांच्या बोलीवर अनुक्रमे पुणे आणि राजकोटने ‘द्वितीय पसंती’ची मोहर उमटवली.
पुण्याने ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनला तिसरी पसंती दिली, तर न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमला राजकोटने संघात स्थान दिले. या दोघांना प्रत्येकी ७.५ कोटी रुपये मिळतील. चौथ्या स्थानासाठी दोन्ही संघांनी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना स्थान दिले. स्टीव्ह स्मिथला पुण्याने आणि जेम्स फॉल्कनरला राजकोटने प्रत्येकी ५.५ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. पाचवा आणि अखेरचा खेळाडू म्हणून दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फॅफ डू प्लेसिसला पुण्याने, तर वेस्ट इंडिजच्या ड्वेन ब्राव्होला राजकोटने संघात स्थान दिले. या दोघांना प्रत्येकी चार कोटी रुपये मिळणार आहेत. ज्या खेळाडूंची निवड प्रक्रियेत निवड झालेली नाही त्यांच्यावर ६ फेब्रुवारीला होणाऱ्या आयपीएलच्या लिलावामध्ये बोली लागेल.
‘‘सर्व खेळाडूंना करारानुसार मानधन देण्यात येईल. प्रत्येक संघाला एकूण संघाच्या खरेदीसाठी ६६ कोटी रुपये वापरता येतील. पुणे आणि राजकोट संघांनी प्रत्येकी ३९ कोटी रुपयांना पाच खेळाडू खरेदी केले आहेत. त्यामुळे आता त्यांच्याकडे उर्वरित संघबांधणीसाठी फक्त २७ कोटी रुपये उपलब्ध असतील. ही सारी आकडेवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात येईल,’’ असे आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले.
‘‘खेळाडूंच्या निवड प्रक्रियेसाठी जी योजना आम्ही आखली होती, ती यशस्वी ठरली. धोनीला प्रथम पसंती देणे स्वाभाविक होते. आम्हाला अपेक्षित असलेले खेळाडू संघात मिळाले आहेत. आमच्या कंपनीकडून खेळणाऱ्या मनोज तिवारी आणि अशोक दिंडा या खेळाडूंशी आम्ही सल्लामसलत केली होती. याशिवाय प्रशिक्षकासाठीही आमची बोलणी सुरू आहेत,’’ असे पुणे फ्रेंचायझीचे प्रतिनिधी सुब्रतो तालुकदार यांनी सांगितले.
‘‘खेळाडू निवडण्यासाठी आम्हीसुद्धा रणनीती आखली होती. धोनी आपल्याला उपलब्ध नसेल, याची आम्हाला खात्री होती. त्यामुळे रैना हाच आमच्यापुढे सर्वोत्तम पर्याय होता. राजकोटच्या खेळपट्टीसाठी आम्हाला आक्रमक फलंदाज आणि भक्कम गोलंदाजीची फळी संघात हवी आहे. आम्ही समतोल संघ बांधणी करू,’’ असे राजकोट फ्रेंचायझीचे मालक केशव बन्सल यांनी सांगितले.
आयपीएलचे पुढील टप्पे
*पहिला हस्तांतरण टप्पा

१५ ते ३१ डिसेंबर २०१५

*दुसरा हस्तांतरण टप्पा

११ ते २२ जानेवारी २०१६

*खेळाडूंचा लिलाव

६ फेब्रुवारी २०१६

*तिसरा हस्तांतरण टप्पा

८ ते १९ फेब्रुवारी २०१६

*संघमालकांसाठी कार्यशाळा

१३ व १४ जानेवारी २०१६

राजकोटच्या वातावरणाची मला चांगली माहिती आहे. कनिष्ठ गटाच्या बऱ्याच स्पर्धा मी येथे खेळलो आहे. महेंद्रसिंग धोनी हा गेली काही वर्षे आयपीएलमध्ये माझ्या संघाचा कर्णधार होता. पण तो पुण्याच्या संघात असल्याने त्याच्याशी खेळभावनेनेच सामना करेन. रवींद्र जडेजाचे हे घरचे मैदान असून त्याच्या अनुभवाचा फायदा होईल.
– सुरेश रैना, राजकोटचा क्रिकेटपटू
आयपीएलमध्येकोणत्याही नव्या संघाला महेंद्रसिंग धोनीसारखा खेळाडू, कर्णधार आणि ब्रँड मिळणे, हे महत्त्वाचे असते. त्याला देशातील खेळाडूंची, त्यांची बलस्थाने आणि कच्चे दुवे यांची माहिती असते. पुण्याचा संघ मला राजकोटच्या तुलनेत अधिक भक्कम वाटतो. राजकोटने ब्रेंडन मॅक्क्युलमकडे नेतृत्व दिल्यास प्रशिक्षकपद भारतीय व्यक्तीकडे द्यावे.
– सुनील गावस्कर, भारताचे माजी कर्णधार