करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका जगभरातील क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. बीसीसीआयनेही सर्व क्रिकेट सामने रद्द केलेले असून भारतीय खेळाडू सध्या आपल्या घरात राहून परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंहने सलामीवीर रोहित शर्मासोबत इन्स्टाग्राम लाईव्ह चॅटवर गप्पा मारल्या. यावेळी हरभजनने सध्याचा भारतीय संघ हा विराट आणि रोहितवर जास्त अवलंबून असल्याचं मत व्यक्त केलं.

“माझ्यामते सध्याचा भारतीय संघ विराट-रोहितवर अवलंबून आहे, संघाला अजुन मॅचविनर खेळाडूंची गरज आहे. आज अनेक खेळाडूंच्या मनात आपलं संघातलं स्थान गमावलं तर काय होईल याची भीती असते. यातूनच ते हवीतशी कामगिरी करु शकत नाहीत.” हरभजनने आपलं मत मांडलं. “रोहित-विराट व्यतिरीक्त हरभजनने लोकेश राहुलच्या खेळाचंही कौतुक केलं. गेल्या काही सामन्यांमध्ये राहुलने केलेला खेळ हा कौतुकास्पद आहे. रोहित-विराट सोडल्यास राहुल दा देखील एक मॅचविनर खेळाडू आहे. तो तुम्हाला हव्या त्या ठिकाणी फलंदाजी करतो. कधी पाचव्या-सहाव्या तर कधी सलामीला…प्रत्येक ठिकाणी त्याची कामगिरी चांगली आहे. यासोबतच तो यष्टीरक्षणही चांगलं करतो.”

न्यूझीलंड दौऱ्यानंतर भारतीय संघ भारतात परतला. मात्र करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा रद्द करण्यात आला. यानंतर आयपीएलची स्पर्धाही पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आलेली आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनेही येत्या काही काळात भारतात क्रिकेट खेळवणं शक्य नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू आता पुन्हा मैदानात कधी उतरतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.