भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारताला कडव्या आव्हानांना सामोरे जावे लागेल. अशा वेळी ते कशा प्रकारे संघनिवड करतात, हे निर्णायक ठरेल, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी व्यक्त केली आहे.

भारत-ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय मालिकेला २७ नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार असून त्यानंतर उभय संघांत तीन ट्वेन्टी-२० आणि चार कसोटी लढतीही खेळल्या जाणार आहेत. १७ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या प्रकाशझोतातील कसोटीत भारताचे नेतृत्व केल्यानंतर कोहली पितृत्वाच्या रजेमुळे मायदेशी परतणार आहे. त्यामुळे त्याच्या जागी भारतीय संघ कोणाला संधी देणार, हे मालिकेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरेल, असे ७७ वर्षीय चॅपेल यांना वाटते.

‘‘कोहलीच्या मायदेशी परतण्याने भारतीय संघात एक पोकळी निर्माण होईल. एकटय़ाच्या बळावर संघाला सावरणारा फलंदाज नसल्यामुळे भारताच्या अन्य फलंदाजांची भंबेरी उडू शकते. परंतु याच वेळी एखाद्या युवा खेळाडूला चौथ्या क्रमांकावर संधी मिळू शकते,’’ असे चॅपेल म्हणाले.

‘‘कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघापुढील प्रमुख आव्हान हे संघनिवडीचे असेल. उपकर्णधार अजिंक्य रहाणेची गेल्या काही वर्षांतील कामगिरी समाधानकारक नाही. तसेच रोहितला तुम्ही चौथ्या क्रमांकावर पाठवू शकत नाही. मग अशा वेळी महत्त्वाच्या चौथ्या स्थानावर कोणता फलंदाज फलंदाजीसाठी येणार, हे फार निर्णायक ठरेल. के. एल. राहुल, हनुमा विहारी यांच्यापैकी एकाला या क्रमांकावर संधी देता येऊ शकते,’’ असेही चॅपेल यांनी सांगितले.

भारताने तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून नवदीप सैनीला संधी द्यावी, असे चॅपेल यांना वाटते. ‘‘जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी यांच्या साथीने तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून नवदीप सैनीचा भारतीय संघात समावेश करण्यात यावा. इशांत शर्माच्या तंदुरुस्तीबाबत संपूर्ण दौऱ्यादरम्यान साशंकता कायम असेल. तसेच उमेश यादवचा सूरही हरवलेला आहे. परंतु सैनीमध्ये एकाच टप्प्यावर सलग चेंडू टाकण्याची क्षमता असून बुमरा-शमीप्रमाणेच त्याच्याकडे वेगही आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना चकवू शकतो,’’ असे चॅपेल यांनी सांगितले. कसोटी संघात निवड करताना नेहमी खेळाडूच्या सध्याच्या कामगिरीला महत्त्व द्यावे, त्यामुळे ऑस्ट्रेलियानेसुद्धा सलामीवीर म्हणून जो बर्न्‍सच्या जागी युवा विल पुकोवस्कीला संधी द्यावी, असे चॅपेल यांनी सुचवले.

कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीसाठी सज्ज -रोहित

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी सज्ज असल्याचे भारताचा सलामीवीर रोहित शर्माने सांगितले. ‘‘कसोटी संघातील स्थान टिकवण्यासाठी मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास सज्ज आहे. मला प्रामुख्याने सलामीवीराची भूमिका निभावणे आवडते. परंतु संघाच्या गरजेनुसार जर मला चौथ्या अथव्या त्याहून खालच्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचे सांगण्यात आले, तर मी नक्कीच त्या आव्हानाला सामोरे जाईन,’’ असे रोहित म्हणाला.