खेळ आणि स्टाइल या दोन्हींसाठी जगविख्यात डेव्हिड बेकहॅमने शनिवारी फुटबॉलविश्वाला अलविदा केला. फुटबॉल हा श्वास असलेल्या या महान फुटबॉलपटूला या प्रसंगी अश्रू अनावर झाले. पॅरिस सेंट जर्मेन या क्लबसाठी खेळताना बेकहॅमने कारकिर्दीतला शेवटचा सामना खेळला.
गेल्याच आठवडय़ात बेकहॅमने आपल्या शानदार खेळाच्या जोरावर पॅरिस सेंट जर्मेनला लिग १चे जेतेपद मिळवून दिले. १९९४ नंतरचे पॅरिस सेंट जर्मेनचे हे पहिलेच जेतेपद. या ऐतिहासिक विजयानंतर बेकहॅमने निवृत्तीची घोषणा केली होती. इंग्लंड, स्पेन, अमेरिका या देशांतील क्लबसाठी जेतेपद मिळवून देणाऱ्या बेकहॅमने समाधानी मनाने निवृत्ती जाहीर केली.
कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणाऱ्या बेकहॅमला प्रशिक्षक कार्लो अ‍ॅनसिलोटी यांनी कर्णधारपद सोपवले. बेकहॅमने कर्णधारपदाची जबाबदारी समर्थपणे निभावत पॅरिस सेंट जर्मेनला ब्रेस्टवर ३-१ ने विजय मिळवला. लाटान इब्राहिमोव्हिकने २ गोल झळकावत या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अन्य गोलमध्ये बेकहॅमच्या कॉर्नरवर ब्लेइस मेटूइडीने गोल करत पॅरिसच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ब्रेस्ट संघातर्फे चार्लिसन बेन्सचॉपने एकमेव गोल केला.
सामना संपण्यासाठी १० मिनिटे असताना अ‍ॅनसिलोटी यांनी बेकहॅमऐवजी बदली खेळाडूची घोषणा केली. बेकहॅम परतू लागताच प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात या महान खेळाडूला मानवंदना दिली. कारकिर्दीत मँचेस्टर युनायटेड, रिअल माद्रिद, एसी मिलान, ला गॅलॅक्सी यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बेकहॅमचा अखेरचा सामना पाहण्यासाठी त्याची पत्नी व्हिक्टोरिया, त्याचे आई-वडील उपस्थित होते. प्रेक्षकांच्या अभूतपूर्व प्रतिसादाने भारावलेल्या बेकहॅमला आपले अश्रू आवरता आले नाहीत.
बेकहॅमने पॅरिस सेंट जर्मेनसाठी जेमतेम डझनभर सामन्यात प्रतिनिधित्व केले. जानेवारी महिन्यात बेकहॅमने पॅरिस सेंट जर्मेनसाठी खेळायला सुरुवात केली. मात्र अल्पावधीतच त्याने या फ्रेंच क्लबला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.